उस्मानाबादेत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या गाडीवर गोळीबार; थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 01:30 PM2022-06-18T13:30:57+5:302022-06-18T13:31:34+5:30
तोंडाला कपडा बांधलेल्या दोघांनी गाडी अडवून केला गोळीबार
वाशी (जि.उस्मानाबाद) :उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास येताळ वस्तीनजिक घडली आहे. या घटनेतून हा पदाधिकारी बालंबाल बचावला. दरम्यान, वाशी पोलिसांनी याप्रकरणी शनिवारी पहाटे गुन्हा दाखल करुन एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड हे १७ जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या खाजगी जीपमधून फक्राबाद येथून पारा गावाकडे निघाले होते. दहा वाजण्याच्या सुमारास ते येताळ वस्तीनजीक येताच दोन व्यक्तींनी त्यांच्या जीपला हात केला. ओळखीचे कोणी असेल म्हणून बिक्कड यांनी वाहनाचा वेग कमी केला. याचवेळी चेहरा झाकलेल्या एकाने जीपच्या समोरुन बंदुकीतून एक गोळी बिक्कड यांच्या दिशेने चालवली.
अंदाज येताच बिक्कड यांनी गोळी चुकवली. यात जीपची काच फुटली. मात्र, प्रसंगावधान राखून त्यांनी लागलीच जीपचा वेग वाढवला. तेव्हा मागच्या बाजूनेही एक गोळी जीपवर झाडण्यात आली. अत्यंत गतीने बिक्कड यांनी जीप तशीच पुढे नेली व पोलिसांनी याची माहिती दिली. तसेच रक्तदाब वाढल्याने पारा येथील रुग्णालयात दाखल झाले. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुरेश ढवळे यांनी लागलीच घटनास्थळाकडे धाव घेत माहिती घेतली.
यानंतर नितीन बिक्कड यांच्या तक्रारीवरून वाशी ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल केला. पहाटेच याप्रकरणी एकास संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वाशी ठाण्यास भेट देऊन घटनेची माहिती घेतली व तपासाबाबत सूचना केल्या. पुढील तपास उपनिरीक्षक पवन निंबाळकर हे करीत आहेत.