आधी अनैतिकता नंतर क्रूरता; मावस बहिणीसोबतच्या संबंधाची वाच्यता केल्याने भावाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 12:08 PM2022-06-11T12:08:55+5:302022-06-11T12:11:12+5:30
संबंधाची वाच्यता करणे तसेच प्लॉट नावे करून देण्यात पुढाकार घेतल्याच्या रागातून
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : मावस बहिणीसोबत असलेल्या संबंधाला विरोध करून कुटुंबात त्याची वाच्यता केल्याने संतापलेल्या तरुणाने आपल्या मावस भावाचाच खून केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सोलापूर-धुळे महामार्गावर घडली होती. याप्रकरणी रात्री उशिरा मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.
तुळजापूर तालुक्यातील मसला खु. येथील ज्ञानेश्वर नानासाहेब करंडे (२९) हे तुळजापूरहून गावाकडे दुचाकीने जात असताना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता वाटेत अडवून त्यांच्यावर कत्तीने वार करीत खून करण्यात आला. याबाबत रात्री उशिरा मयत ज्ञानेश्वरचा भाऊ भैरुनाथ करंडे याने तुळजापूर पोलिसांकडे तक्रार दिली. या तक्रारीत ज्ञानेश्वरचा खून हा त्याचा मावस भाऊ रामेश्वर संभाजी खोचरे याने केल्याचे म्हटले आहे. रामेश्वरचे त्याच्याच मावस बहिणीशी संबंध होते. याची माहिती ज्ञानेश्वरला झाली होती. त्यामुळे ज्ञानेश्वरने रामेश्वर खोचरे, त्याचे वडील संभाजी खोचरे, भाऊ परमेश्वर खोचरे यांना या प्रकाराची माहिती दिली होती. हा प्रकार समाजात आपणास काळिमा फासण्यासारखा असून, हे संबंध तोडावेत, असे सांगत त्याने नातेवाइकांत बैठक घडवून आणली होती.
यासाठी आरोपी रामेश्वरच्या नावे उस्मानाबाद शहरात असलेला एक प्लॉट त्या मावस बहिणीच्या नावे करून देण्यात आला होता. संबंधाची वाच्यता करणे तसेच प्लॉट नावे करून देण्यात पुढाकार घेतल्याचा राग आरोपी रामेश्वरच्या मनात होता. या रागातूनच त्याने गुरुवारी सायंकाळी महामार्गावरून गावाकडे येत असताना ज्ञानेश्वरचा खून केल्याचे भैरुनाथ यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने आरोपी रामेश्वर खोचरे, संभाजी खोचरे, परमेश्वर खोचरे, अनिता भोसले (सर्व रा. येवती, ता. जि. उस्मानाबाद) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद म्हणाले, या गुन्ह्यात चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली आहेत. यामध्ये दोन अधिकारी व सहा कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.