मच्छिमार आंदोलकांची केली उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:36 AM2021-09-05T04:36:41+5:302021-09-05T04:36:41+5:30

उस्मानाबाद : सीना कोळेगाव धरणात स्थानिक मच्छिमारांनाच पासेस द्यावेत, या मागणीसाठी मत्स्य व्यवसाय कार्यालयाच्या छतावर चढून सुरू करण्यात आलेले ...

Fishermen's protest | मच्छिमार आंदोलकांची केली उचलबांगडी

मच्छिमार आंदोलकांची केली उचलबांगडी

googlenewsNext

उस्मानाबाद : सीना कोळेगाव धरणात स्थानिक मच्छिमारांनाच पासेस द्यावेत, या मागणीसाठी मत्स्य व्यवसाय कार्यालयाच्या छतावर चढून सुरू करण्यात आलेले आंदोलन एकाने विष घेतल्यानंतर चिघळले होते. प्रयत्न करूनही आंदोलक मागे हटण्यास तयार नसल्याने अखेर शनिवारी दुपारी पोलीस बळाचा वापर करून त्यांना खाली उतरविण्यात आले. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन आनंदनगर ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा व उस्मानाबाद जिल्ह्यांतील परंडा तालुक्यात विस्तार असलेल्या सीना-कोळेगाव धरणात मत्स्य व्यवसायाचा एकास ठेका देण्यात आला आहे. मासेमारीसाठी स्थानिक मच्छिमारांना प्राधान्य द्यावे, असा नियम असतानाही बाहेरच्या राज्यातून मच्छिमार आणून व्यवसाय केला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानिक मच्छिमारांनी जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी उस्मानाबादेतील मत्स्य व्यवसाय कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. येथे अधिकारीच हजर नसल्याने आंदोलकांनी खुर्चीला माश्यांचा हार घालून निषेध केला. तरीही दाद मिळत नसल्याने आंदोलकांनी कार्यालयाच्या छतावर चढून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत पासेस मिळत नाहीत, तोपर्यंत तेथेच ठिय्या देण्याचा निर्धार करीत संपूर्ण रात्र जागून काढली. यामुळे पोलीस, महसूल, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलही रात्रभर ताटकळत राहिले. दरम्यान, शनिवारी निवासी उपजिल्हाधिकारी, मत्स्य व्यवसाय विभागाचे लातूर येथील उपसंचालक, पोलीस उपअधीक्षक यांनी आंदोलकांची छतावरच भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी याबाबत लातूरला बैठक लावण्याचे आश्वासनही देण्यात आले. मात्र, आंदोलकांनी आपला हट्ट कायम राखत तेथून न हलण्याचा निर्धार बोलून दाखविला. यामुळे अखेर दुपारी पोलीस बळ वापरून सर्वच आंदोलकांना खाली उतरविण्यात आले. त्यांना आनंदनगर ठाण्यात नेऊन तेथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

त्या आंदोलकाची प्रकृती स्थिर...

छतावर आंदोलन सुरू असताना सोलापूर जिल्ह्यातील दिलमेश्वर येथील अशोक पोपट नगरे या तरुणाने शुक्रवारी रात्री विषारी द्रव प्राशन केले होते. हा प्रकार कळताच तेथे उपस्थित अन्य आंदोलक व पोलिसांनी त्यास तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या आंदोलकाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

Web Title: Fishermen's protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.