नियम पाळा, अन्यथा कारवाईस सामोरे जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:33 AM2021-05-27T04:33:49+5:302021-05-27T04:33:49+5:30
तुळजापूर : कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी शहरातील कृषी सेवा केंद्रांना नगरपरिषदेच्या वतीने बुधवारी विविध उपाययोजनांबाबत नोटिसा बजाविण्यात ...
तुळजापूर : कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी शहरातील कृषी सेवा केंद्रांना नगरपरिषदेच्या वतीने बुधवारी विविध उपाययोजनांबाबत नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच याचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारादेखील देण्यात आला आहे.
यात महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० प्रसिध्दी केली असून, या रोगाचा प्रार्दुभाव रोखण्याकरिता शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. या सूचनांचे काटेकोरपालन करून त्याचे उल्लंघन होणार नाही याची प्रत्येक दुकानदारांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना या नोटिसीद्वारे करण्यात आल्या आहेत. कोणत्याही साहित्याची विक्री तोंडाला मास्क असल्याशिवाय करू नये. दुकानामध्ये सॅनिटायझरचा पुरेसा स्टॉक करून ठेवावा व येणाऱ्या प्रत्येक ग्राहकास त्याचा वापर करण्याच्या सूचना द्याव्यात. फिजिकल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करावे. कामगारांच्या वेळोवेळी कोरोना चाचण्या कराव्यात. दुकानामध्ये थर्मल स्कॅनर व ऑक्सिमीटर याचा वापर करण्यात यावा व कोरोनाचे कोणतेही
लक्षण आढळून आल्यास त्या व्यक्तीला कोरोना केअर सेंटर किंवा उपजिल्हा रुग्णालयात भरती करावे, दुकानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी २ इतकीच निर्धारित केलेली आहे. त्यामुळे या वेळेव्यतिरिक्त दुकान उघडे ठेवू नये, असेही या नोटिसीत म्हटले आहे.
या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ तसेच इतर लागू होणाऱ्या तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा या नोटिसीत देण्यात आला आहे.
चौकट............
खरेदीसाठी वाढतेय गर्दी
मागील आठवड्यापासून तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यात ग्रामीण भागातील रुग्णांचादेखील समावेश जास्त आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर शहरात येत असल्याने या संसर्गाचा प्रसार होऊ नये, या उद्देशाने नगरपरिषदेने कृषी सेवा केंद्र दुकानदारांना नोटीस बजावली आहे.