माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 05:51 AM2024-10-03T05:51:00+5:302024-10-03T05:51:28+5:30
आजारातून काहीसे बरे होताच त्यांनी परंडा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती.
परंडा (जि. धाराशिव) : परंडा तालुक्यातील भोत्रा येथील मूळ निवासी माजी आमदार तथा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांची बुधवारी रात्री १०:२७ वाजता प्राणज्योत मालवली. ते गेल्या काही महिन्यांपासून दीर्घ आजारांवर पुण्यात उपचार घेत होते.
आजारातून काहीसे बरे होताच त्यांनी परंडा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, तत्पूर्वीच त्यांना नियतीने गाठले. अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना त्यांनी तारुण्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपवर चालक म्हणून काम केले. याचं काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेत कार्यरत झाले.
संघटनेत विविध पदे भूषवित असताना त्यांना १९९५ व १९९९ साली विधानसभेवर मतदारांनी निवडून दिले. तत्पूर्वी ते बिनविरोध नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त रात्री उशिरा धडकताच परंडा मतदारसंघात शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी परंडा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, ११ वाजता त्यांच्या शेतात अंत्यविधी होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.