चाळीस घरे, सहा हॉटेल्स जमीनदोस्त
By Admin | Published: July 12, 2017 10:06 PM2017-07-12T22:06:21+5:302017-07-12T22:06:21+5:30
राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी संपादीत केलेल्या जागेवर उभारलेली घरे, हॉटेल रिकामे करण्यासाठी बुधवारी तुळजापूर तालुक्यातील
ऑनलाइन लोकमत
तामलवाडी(उस्मानाबाद), दि. 12 - राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी संपादीत केलेल्या जागेवर उभारलेली घरे, हॉटेल रिकामे करण्यासाठी बुधवारी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे महसूल प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करीत ४० घरे, ६ हॉटेल जेसीबी मशीनद्वारे जमीनदोस्त केली. ही अतिक्रमण मोहीम दिवसभर सुरू होती. ७५ पोलीस कर्मचारी व अधिकारी दिवसभर येथे ठाण मांडून होते.
हा राष्ट्रीय महामार्ग गावाचे मध्यभागातून जातो. रुंदीकरणासाठी जमीन संपादन करून मावेजा वाटपाची कारवाई सुरू झाल्यानंतर बुधवारी भू-संपादन, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपविभागीय अधिकारी गिरासे, तहसीलदार दिनेश झांपले, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत खांडवी यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी ८ वाजता घरे व हॉटेल पाडून रिकामे करण्यास प्रारंभ केला. रुंदीकरण कामात अडथळा ठरणारी घरे, हॉटेल जमीनदोस्त करून रुंदीकरण कामासाठी जागा मोकळी करण्यात आली. बंदोबस्तासाठी उस्मानाबाद येथून दोन दंगल नियंत्रक पथक पाचारण करण्यात आले होते, तर तामलवाडी पोलीस ठाण्यातील सपोनि नितीन मिरकर यांच्यासह ७५ पोलीस कर्मचारी कार्यरत होते.
मावेजा वाटपात तफावत
तामलवाडी येथील शिवाजी रामा जगताप व साहेबराव रामा जगताप या दोघा भावांची जागा रस्ता रुंदीकरणासाठी राहत्या घरासह संपादीत झाली. दोघांच्या घराचे बांधकाम सारखे असताना शिवाजी जगताप यांना ४ लाख ४३ हजार, तर साहेबराव जगताप यांना २ लाख ६० हजार रुपये मावेजाची नोटीस ११ जुलै रोजी जारी केली. दिलेल्या नोटिसीत संपादीत क्षेत्राचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. मावेजामध्ये तफावत दर्शविल्याने जागामालकांत संभ्रम निर्माण झाला आहे.
सामान रस्त्यावर फेकले-
बुधवारी सकाळी ११ वाजता हे पथक पोलीस ठाण्यानजिक मनिषा टी-हाऊसवर पोहोचले. यावेळी हॉटेल चालकाचे कसलेही म्हणणे ऐकून न घेता पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी खुर्च्या, टेबल एकत्रित करून सामान रस्त्यावर फेकले, तर पान टपऱ्या, सलून दुकानाचे मशीनने नुकसान केले. यावेळी सर्व व्यावसायिकांना यापूर्वीच नोटिसा देवून जागा रिकामी करण्याबाबत पूर्वकल्पना दिली असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसटी सेवा गावाबाहेरून-
माळुंब्रा गावातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग गावाबाहेर गेला असून, याच रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे गावात येणारी एसटी बंद झाली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. माळुंब्रा येथे राज्य परिवहन महामंडळाचा अधिकृत परवाना (थांबा) असतानाही प्रवाशांची गैैरसोय होत आहे.
नोटिसीनंतर तासाभरात पाडकाम-
जागा व घर यांचे नुकसानभरपाईपोटी भू-संपादन विभागाने तलाठ्यामार्फत बुधवारी सकाळी ८ वाजता १२ जणांना मावेजा उचलण्यासाठी नोटीस दिली. यानंतर तासाभरातच पाडकाम सुरू केले. त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. मावेजा खात्यावर जमा न करता जागा ताब्यात घेऊन चार मशीनने पाडकाम केले.