उस्मानाबाद जिल्ह्यातील सीना-कोळेगाव धरणाचे चार दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 10:21 AM2020-10-14T10:21:22+5:302020-10-14T10:22:15+5:30
Discharge of water from Sina- kolegaon Dam : मध्यरात्रीच्या सुमारास धरण पूर्ण क्षमतेने भरले
उस्मानाबाद - जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या सीना-कोळेगाव धरण मंगळवारी रात्रीच्या पावसाने पूर्ण भरले. यामुळे धरणाचे ४ दरवाजे उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे परांडा तालुक्यातील सीना-कोळेगाव धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु होती. त्यामुळे दिवसागणिक धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत होती. मंगळवारी सायंकाळी धरण 95 टक्क्यांवर भरले होते. असे असतानाच रात्री धरण क्षेत्रात पुन्हा पाऊस झाला. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास धरण पूर्ण क्षमतेने भरले.
संभाव्य धोका लक्षात घेऊन रात्रीच धरणाचे दोन दरवाजे उचलले. मात्र पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरूच असल्याने बुधवारी सकाळी आणखी दोन दरवाजे उचलून पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.