बालाघाटच्या डोंगरातील चार तलाव ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:36 AM2021-09-27T04:36:21+5:302021-09-27T04:36:21+5:30

कळंब : मागच्या आठवडाभरात येरमाळा भागात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे येडेश्वरी डोंगररांगाच्या निसर्गरम्य भागात स्थिरावलेल्या चोराखळी साठवण तलावासह ...

Four lakes in the Balaghat hills overflow | बालाघाटच्या डोंगरातील चार तलाव ओव्हरफ्लो

बालाघाटच्या डोंगरातील चार तलाव ओव्हरफ्लो

googlenewsNext

कळंब : मागच्या आठवडाभरात येरमाळा भागात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे येडेश्वरी डोंगररांगाच्या निसर्गरम्य भागात स्थिरावलेल्या चोराखळी साठवण तलावासह अन्य तीन तलाव ओसंडून वाहत आहेत.

कळंब तालुक्यातील येरमाळा भागातून बालाघाटाच्या डोंगररांगा गेल्या आहेत. या भागाला येडेश्वरी डोंगर असेही संबोधले जाते. याच भागात चोराखळी, मलकापूर, येरमाळा व येडेश्वरी हे पाटबंधारे विभागाचे चार साठवण तलाव बांधण्यात आलेले आहेत. चारही तलाव निसर्गरम्य अशा बालाघाटाच्या डोंगररांगेत आहेत. अशा या परिसरात सप्टेंबर महिन्यात दखलपात्र पाऊस झाला. यामुळे पाण्याची झालेली चांगली आवक पाटबंधारे प्रकल्पाच्या झोळीत पाण्याची भर घालणारी ठरली आहे. यातही सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचा जोर अधिक वाढला. यामुळे आजच्या स्थितीत चोराखळी, मलकापूर व येरमाळा येथील येडेश्वरी, येरमाळा हे तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

चौकट...

६.८८० दलघमी साठा...

चोराखळी साठवण तलावाची साठवण क्षमता ३.४३४ दलघमी असून, २४ सप्टेंबरला तो ओव्हरफ्लो झाला आहे. याशिवाय १.४०९ दलघमी क्षमतेचा येरमाळा, १.०९२ क्षमतेचा येडेश्वरी, तर ०.९४५ दलघमी क्षमतेचा मलकापूर तलाव ओसंडून वाहत आहेत.

तब्बल ३४० मिमी पावसाची नोंद...

सप्टेंबर महिन्यात महावेधने घेतलेल्या पावसाच्या नोंदीनुसार, येरमाळा येथे तब्बल ३४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यातील आजवरचा हा विक्रमी पाऊस आहे.

पूल गेला वाहून

चोराखळी येथे अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतशिवारात पाणीच पाणी झाले आहे. याचाच फटका गावाजवळच्या स्मशानभूमीत जाणाऱ्या रस्त्यावरील पुलास बसला आहे. हा पूल वाहून गेला आहे. याशिवाय येथील एका पाझर तलावाची धोकादायक स्थिती झाली आहे. याची आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पाहणी करून संबधित विभागाला सूचना दिल्या आहेत.

संजीतपूरच्या पुलावर तिसऱ्या दिवशीही पाणी

तालुक्यातील संजीतपूर शिवारातील रस्ते, शेतवाटा पाण्यात पोहत आहेत. अतिवृष्टीमुळे ही स्थिती ओढवली आहे. गावाला जोडणाऱ्या संजीतपूर, सापनाई, येरमाळा या रस्त्यावरील पुलावरून तीन दिवसांपासून पाणी वाहत आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. गावातील शेत शिवारातही अशीच स्थिती असल्याचे समाधान बाराते यांनी सांगितले.

पावसाने सप्टेंबरची सरासरी ओलांडली

तालुक्यात सप्टेंबर महिन्यात १९७ मिलिमीटर सरासरी पाऊस पडत असतो. आजच्या स्थितीत तालुक्यात २३१ मिमी पाऊस झाला आहे. यात शनिवारी तालुक्यातील कळंब २४, इटकूर येथे १७.८,येरमाळा २१.३,मोहा २९.८,शिराढोण २३.८ व गोविंदपूर येथे २६.३ मिलिमीटर असा पाऊस झाला आहे.

Web Title: Four lakes in the Balaghat hills overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.