कळंबमधील चार व्हेंटिलेटर उस्मानाबादेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:30 AM2021-04-14T04:30:17+5:302021-04-14T04:30:17+5:30
कळंब : गतवर्षी उप-जिल्हा रुग्णालयात ‘व्हेंटिलेटर’ची गरज निर्माण झाल्याने विविध पक्ष, संघटना आक्रमक झाल्या होत्या. यानंतर प्राप्त ...
कळंब : गतवर्षी उप-जिल्हा रुग्णालयात ‘व्हेंटिलेटर’ची गरज निर्माण झाल्याने विविध पक्ष, संघटना आक्रमक झाल्या होत्या. यानंतर प्राप्त झालेल्या सहा व्हेंटिलेटर ‘अॅक्टिव्हेशन’साठीही संघर्ष करावा लागला होता. एवढे सारे रामायण होऊन पदरी पडलेले चार व्हेंटिलेटर अचानक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णसंख्येने हजाराचा पल्ला गाठल्यानंतर तोकड्या आरोग्य यंत्रणेचा प्रश्न समोर आला होता. गंभीर रुग्णांना यामुळे कळंब सोडून उपचारासाठी अन्य शहर गाठावे लागत होते. या स्थितीत उप-जिल्हा रुग्णालयास व्हेंटिलेटर उपलब्ध करावेत, अशी मागणी पुढे आली होती. यासाठी विविध संघटना, पक्ष आक्रमक झाले होते. दरम्यान, पीएम केअरमधून पाच तर आ. कैलास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून एक असे सहा व्हेंटिलेटर कळंब उपजिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले होते.
यानंतर दाखल झालेले व्हेंटिलेटर कार्यान्वित होण्यासाठीही आंदोलने करावी लागली होती. तद्नंतर कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाचा प्रश्न होताच. एवढ्या अडथळ्यांची शर्यत पार करून सद्यस्थितीत कळंब उपजिल्हा रुग्णालयात उपरोक्त यंत्रणा कार्यान्वित झाली होती.
असे असतानाच उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयातील तातडीची निकड लक्षात घेता कळंब येथील चार व्हेंटिलेटर द्यावेत, असे पत्र कळंब येथील वैद्यकीय अधीक्षक यांना देण्यात आले. यानुसार सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयाने कळंब येथील चार व्हेंटिलेटर नेले.
यामुळे ही जीवरक्षक सामग्री कळंब उप-जिल्हा रुग्णालयास परत मिळाली तर ठीक, नाही तर आगामी काळात कळंब येथील आरोग्य यंत्रणेची ‘हातचं देऊन, पळत्याच्या पाठीमागे धावण्याची’वेळ येणार आहे.
प्रतिक्रिया
कळंब उप-जिल्हा रुग्णालयात सहा व्हेंटिलेटर कार्यान्वित होते. यापैकी चार व्हेंटिलेटर तात्पुरत्या स्वरूपात द्यावेत, अशा वरिष्ठांच्या सूचना होत्या. उसणवारी तत्त्वावर ते देण्यात आले आहेत. याठिकाणी सध्या दोन व्हेंटिलेटर कार्यान्वित आहेत. गरज लागल्यावर ते परत देणार आहेत.
- डॉ. जीवन वायदंडे, वैद्यकीय अधीक्षक, कळंब.