८८ वर्षीय आजाेबांसह १४ ज्येष्ठांनी काेराेनाला केले चितपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:21+5:302021-06-05T04:24:21+5:30
मुरूम - प्रखर इच्छाशक्ती आणि योग्य उपचारानंतर मुरूम शहरातील १४ वृध्दांनी कोरानाला हरवले आहे. यामध्ये ८८ वर्षांच्या आजोबासह ७० ...
मुरूम - प्रखर इच्छाशक्ती आणि योग्य उपचारानंतर मुरूम शहरातील १४ वृध्दांनी कोरानाला हरवले आहे. यामध्ये ८८ वर्षांच्या आजोबासह ७० ते ८८ वय असलेल्या वृध्दांचा समावेश आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे विषाणू पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक गंभीर आहेत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरात या आजाराने आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ७२ ते ९४ वय असलेल्या तीन वृध्दांचा समावेश आहे. दुसऱ्या लाटेत ७० ते ९४ वय असलेल्या शहरातील १९ जणांना कोरोनाची लागण होती. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून १४ जणांनी उपचारानंतर कोरोनाला हरवले आहे. सध्या दोन वृध्दांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. १९ पैकी नऊ महिलांना, तर दहा पुरुषांना कोरोनाची लागण होती. एका ९४ वर्षांच्या महिलेसह दोन पुरुषांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. शहरात मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. आतापर्यंत २४६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी २०६ जणांनी उपचारानंतर कोरोनाला हरवले असून सध्या २८ रुग्ण उपचाराखाली आहेत, तर एकूण १२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ७० ते ८० वयादरम्यान बारा, तर ८३ ते ८८ वयातील सहा आणि ९४ वर्षांवरील एक अशा एकूण १९ वृध्दांना कोरोनाची लागण झाली होती. यात १४ जणांनी उपचारानंतर कोरोनाला हरवले आहे.
चाैकट...
शहरातील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी २२ कोरोनासंशयित आणि संपर्कातील लोकांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. यामध्ये शहरातील माळी गल्लीतील एकाला नव्याने कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. शहरातील कोविड सेंटरमध्ये उमरगा व लोहारा तालुक्यातील ३० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर बरे झालेल्या पाच रुग्णांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात आठ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजित डूकरे आणि पालिकेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी दिली.