मित्रमंडळाने स्वीकारली ‘त्या’ बालकांच्या पालनपोषण, शिक्षणाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:34 AM2021-07-28T04:34:10+5:302021-07-28T04:34:10+5:30
तुळजापूर तालुक्यातील अणदूर शिवारातील पाटील तांडा येथील सुनीता दिनेश राठोड यांनी शनिवारी (दि. २४) उमरगा बसस्थानकात एक महिन्याच्या ...
तुळजापूर तालुक्यातील अणदूर शिवारातील पाटील तांडा येथील सुनीता दिनेश राठोड यांनी शनिवारी (दि. २४) उमरगा बसस्थानकात एक महिन्याच्या तान्ह्या बाळासह तीन वर्षांच्या मुलीला सोडून पलायन केले होते. दरम्यान, मुलींचा त्याग करू पाहणाऱ्या या कुटुंबाच्या परिस्थितीचा अंदाज घेतला असता त्या भूमिहीन व शेतमजूर असून, सुनीताचा पती दिनेश दारूच्या आहारी गेला होता. त्याला कंटाळून सुनीता या माहेरी जाणार आहे असे सांगून शनिवारी दोन मुलींसह माहेरी निघाल्या. उमरग्यात येताच त्यांनी दोन्ही लेकरांना बसस्थानकात सोडून तेथून पळ काढला होता. मात्र, काही तासांतच पोलिसांनी या कुटुंबाचा शोध घेऊन या चिमुकल्यांना परत माता-पित्याच्या स्वाधीन केले.
सदर प्रकार साहेबराव घुगे मित्रमंडळाला समजल्यानंतर त्यांनी मंगळवारी सुनीता राठोड यांच्या घरी जाऊन सुनीता व त्यांच्या तीनही लेकरांना औषधोपचार, कपडे व शैक्षणिक साहित्य देऊन त्या तिन्ही मुलींचे दहावीपर्यंतच्या शिक्षणाची व आरोग्यविषयक देखभालीची जबाबदारी स्वीकारली. शिवाय, या तिन्ही बालकांची आरोग्यविषयक जबाबदारी डॉ. व्यंकटेश घुगे यांनी घेतली आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य साहेबराव घुगे, डॉ. व्यंकटेश घुगे, शाहूराज मोकाशे, राहुल राठोड, चंद्रकांत गुड्ड, संजय आलुरे, गुंडेशा गोवे, म्हाळाप्पा घोडके, काशीनाथ घुगे, प्रज्योत कर्पे, आदी उपस्थित होते.