तडवळ्यातील स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:27 AM2021-07-25T04:27:12+5:302021-07-25T04:27:12+5:30

(फोटो : कसबे तडवळे २४) उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यातील कसबे तडवळे येथील ...

Funding for the Tadwala memorial will not be cut short | तडवळ्यातील स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही

तडवळ्यातील स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही

googlenewsNext

(फोटो : कसबे तडवळे २४)

उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यातील कसबे तडवळे येथील डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जागेचा प्रश्न तत्काळ निकाली काढून लवकरच हे स्मारक उभारले जाईल. या स्मारकाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

शनिवारी राज्यमंत्री बनसोडे यांनी कसबे तडवळे येथे भेट देऊन स्मारक उभारण्याच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्मारकाच्या जागेचा प्रस्ताव मंत्रालयात पडून आहे. त्या प्रस्तावाची माहिती घेऊन तात्काळ संबंधित विभागांचे मंत्री, सचिव यांची बैठक घेऊन जागेचा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे सांगून बनसोडे म्हणाले, या शाळेतील ज्या खोलीत बाबासाहेब थांबले होते, त्या खोलीचे बांधकाम ‘जैसे थे’ ठेऊन त्याच परिसरात हे स्मारक साकारण्यात येणार आहे. परंतु, या शाळेत सध्या पाचशेच्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या शिक्षणातही खंड पडू नये याचाही विचार करून शाळेसाठी जागा बघितल्या आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने ठराव घेऊन शाळेची जागा स्मारकास देण्याचा ठराव घेतला आहे. तेव्हा या जागेचा प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.

बनसोडे यांनी कसबे-तडवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भेट देऊन त्यांच्या स्मृतीस या वेळी अभिवादन केले. यानंतर त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आ. विक्रम काळे, एस. पी. शुगरचे चेअरमन सुरेश पाटील, माजी आमदार राहुल मोटे, राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बी. जी. अरवत, तहसीलदार गणेश माळी, कसबे तडवळे येथील सरपंच किरण औटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर आदी उपस्थित होते.

Web Title: Funding for the Tadwala memorial will not be cut short

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.