भुयारी मार्गासाठी घातले गडकरींना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:33 AM2021-03-18T04:33:13+5:302021-03-18T04:33:13+5:30
उमरगा : उमरगा-लोहारा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे मागील सहा वर्षांपासून कासवगतीने चालू असून, तेही निकृष्ट होत आहे, शिवाय ...
उमरगा : उमरगा-लोहारा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे मागील सहा वर्षांपासून कासवगतीने चालू असून, तेही निकृष्ट होत आहे, शिवाय महामार्गालगत असलेल्या गावांना भुयारी मार्ग, उड्डाणपुलाची सोय नसल्याने, महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. अनेक उड्डाणपूल अपूर्ण असताना, कंत्राटदाराने सक्तीने टोलवसुलीही सुरू केली असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांच्यासह शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली.
यावेळी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उस्मानाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार, माजी आ.राहुल मोटे, आ.कैलास पाटील, ॲड.अभय चालुक्य, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, दीपक जवळगे यांची उपस्थिती होती.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने उमरगा व लोहारा तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून, तेही निकृष्ट होत आहे. महामार्गालगत असलेल्या बलसूर मोड, डाळिंब, रामपूर, जकेकूर, दाबका, दस्तापूर या गावांतील नागरिकांच्या सुरक्षितेसाठी भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलाची सोय करण्यात आलेली नाही. महामार्गावरून वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण नसल्याने रस्ता ओलांडताना यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. आता चौपदरीकरण झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढू शकते, असे या निवेदनात म्हटले आहे.
बलसूर मोड येथून बलसूर, समूद्राळ, सास्तूर आदी गावांना जाणारा हा मुख्य रस्ता आहे, तसेच बलसूर-लोहारा मार्गावर दोन साखर कारखाने आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र, बलसूर मोड येथे भुयारी मार्गाची सोय नसल्याने, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात चार वेळेस रस्ता रोको, धरणे आंदोलन करण्यात आले, परंतु महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमार्फत फक्त आश्वासने देण्यात आली आणि निकृष्ट स्वरूपाचे काम रेटून नेण्यात आले. यामुळे महामार्गावर मोठमोठे खड्डे पडत असून, अनेक ठिकाणी रस्ता खचून खड्डे निर्माण होत आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिल्याचे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत फोनवरून सूचना दिल्याचे. प्रा.बिराजदार यांनी सांगितले.