गॅस वितरण सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरणाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:24 AM2021-06-01T04:24:34+5:302021-06-01T04:24:34+5:30
उस्मानाबाद : कोरोना काळात हाॅटेलसह रेस्टाॅरंट बंद असली तरी शहरात गॅस सिलिंडरची डिलिव्हरी सुरू आहे. त्यामुळे ही डिलिव्हरी देणाऱ्या ...
उस्मानाबाद : कोरोना काळात हाॅटेलसह रेस्टाॅरंट बंद असली तरी शहरात गॅस सिलिंडरची डिलिव्हरी सुरू आहे. त्यामुळे ही डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग प्रतिबंधक लस न मिळाल्यामुळे सातत्याने जीव मुठीत घेऊन प्रत्येक ग्राहकांच्या दारात जावे लागत आहे. आतापर्यंत शहरातील ५ वितरकांकडील ५० हून अधिक कर्मचारी लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना प्राधान्याने कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक लस देण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यातून केवळ आरोग्य, पोलीस अशा विभागांतील कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला, तर अन्य फ्रंटलाइन वाॅरियर्स म्हणून संबोधलेल्यांना पहिल्या टप्प्यातील लस मिळाली नाही. त्यापैकी थेट ग्राहकांशी संबंध येणाऱ्या डिलिव्हरी बाॅयचाही समावेश आहे. शहरात एकूण ५ गॅस वितरकांकडे सुमारे ५० जण काम करीत आहेत. यातील एकाही व्यक्तीस लस मिळालेली नाही. लस मिळावी यासाठी वितरक कंपन्यांनी प्रशासन व शासकीय रुग्णालयांना पत्र देऊनही लस मिळालेली नाही. खासगी रुग्णालय लसीकरण सुरू असताना काही गॅस वितरकांनी लस घेण्यासाठी नोंदणी केली होती. त्यानंतर खासगी रुग्णालयातीलही लसीकरण बंद झाल्याने डिलिव्हरी बॉय लसीकरणापासून वंचित राहिले आहेत.
सिलिंडर सॅनिटाईज केले का?
डिलिव्हरी बॉय ग्राहकांना सिलिंडर सॅनिटायज करूनच वापरा असे सांगतात. अनेक ग्राहक हे घरी सिलिंडर पोहोचता झाल्यानंतर सॅनिटायज करतात. तसेच रिकामा सिलिंडर घेताना डिलिव्हॅरी बॉयही सिलिंडर सॅनिटायज करून हाताळत आहेत. सिलिंडरला सॅनिटायझर लावतानाही खबरदारी घेतली जात आहे. सिलिंडरच्या रिंगास केवळ सॅनिटायज केले जाते.
१ डिलिव्हरी बॉय पाॅझिटिव्ह
जिल्ह्यात कोरोना काळातही मागील चौदा महिन्यांपासून डिलिव्हरी बॉय सेवा बजावत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क तसेच सॅनिटायझरच्या वापरावर भर दिला जात आहे. अद्यापर्यंत ५० डिलिव्हरी बॉयपैकी १ जण पॉझिटिव्ह आला आहे.
अशी आहे आकडेवारी
शहरातील एकूण घरगुती गॅसग्राहक ४५ हजार
गॅस वितरण करणाऱ्या एजन्सी ५
घरपोच डिलिव्हरीसाठी असेलेले कर्मचारी ५०
किती कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस ००
किती कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस ००
एकही डोस न घेणारे कर्मचारी ५०
डिलिव्हरी बॉय म्हणतात
कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत. मात्र, गॅस वितरण अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे मागील चौदा महिन्यांपासून आम्ही गॅस घरी पोहोचविण्याचे काम करीत आहोत. मात्र, आम्हांला अद्याप लस मिळालेली नाही.
- नारायण जाधव
प्रतिदिन ५० घरी गॅस पोहोचविण्याचे काम करावे लागते. अनेक व्यक्तीशी आमचा थेट संपर्क येतो. लस अद्याप मिळालेली नाही. सुरक्षेच्या दृष्टीने मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यावर भर दिला जात आहे.
- अमजद शेख
कोट...
घरोघरी गॅस सिलिंडर पोहाेचविणाऱ्या डिलिव्हॅरी बॉयचे प्राथमिकतेने लसीकरण होणे गरजेचे आहे. डिलिव्हॅरी बॉयच्या लसीकरणाची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकऱ्यांवर आहे.
- हरिकल्याण यलगट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषद उस्मानाबाद