आता घरातूनच काढा लर्निंग लायसन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 04:04 AM2021-06-12T04:04:05+5:302021-06-12T04:04:05+5:30
उस्मानाबाद : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अनेकांना लर्निंग लायसन्स काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता राज्य सरकारने ...
उस्मानाबाद : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अनेकांना लर्निंग लायसन्स काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता राज्य सरकारने लर्निंग लायसन्ससाठी घेण्यात येणारी परीक्षा घरातून देण्यास परवानगी दिली आहे. तसे आदेश आरटीओ कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी नागरिकांना आता ‘आरटीओ’मध्ये जाण्याची गरज भासणार नसून घरबसल्या लर्निंग लायसन्स काढता येणार आहे.
गाडी चालविताना प्रत्येकाकडे लायसन्स असणे अनिवार्य आहे. विशेष करुन तरुण मुला-मुलींकडे लायसन्स असणे गरजेचे आहे. मात्र, आजकाल कमी वयात गाडी मिळाल्याने अनेक मुला-मुलींकडे लर्निंग लायसन्स नसते. त्यात लायसन्स काढण्याची प्रक्रिया किचकट असून लायसन्ससाठी नागरिकांना आरटीओ कार्यालयात चकरा माराव्या लागत असत. यात नागरिकांचा वेळ व पैसाही वाया जात. किचकट प्रक्रियेमुळे अनेक नागरिक लायसन्स काढण्याचा कंटाळा करीत असत. कोरोना काळात बंदमुळे अनेकांना लर्निंग लायसन्स काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता राज्य शासनाने घरबसल्या लर्निंग लायसन्सची सोय करुन दिली आहे. नागरिकांना घरी बसून ऑनलाईन परीक्षा देता येणार आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लायसन्सची ऑनलाईन प्रिंट देखील काढता येणार आहे.
वाहनधारकांची गैरसोय होणार दूर
वाहनधारकांना लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागत होते. त्या ठिकाणी वेळ आणि पैसा खर्च होत होता. या किचकट प्रक्रियेमुळे अनेकजण लायसन्स काढण्याचे टाळत. मात्र, आता ऑनलाईन घरबसल्या परीक्षा देऊन लायसन्स मिळविणे सुलभ झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
असा करा ऑनलाईन अर्ज
अर्जदारास परिवहन संकेतस्थळावर अर्ज सादर करताना स्वत:चा आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता व आधार डेटाबेस मधून परिवहन या संकेतस्थळावर येणार आहे. यामुळे अर्जदाराच्या ओळखीची व पत्त्याची खातरजमा करावी लागणार नाही. अर्जदारांनी रस्ता सुरक्षेविषयी व्हिडिओची पाहणी केल्यानंतर घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्तीची चाचणी देणार असून विचारलेल्या ६० प्रश्नांचे अचूक उत्तर दिल्यास चाचणी उत्तीर्ण होऊन घरबसल्या त्यास लर्निंग लायसन्स मिळणार आहे.
नवीन वाहनांची नोंदणी वितरकांकडूनच
केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार आता परिवहनेतर संवर्गातील नवीन वाहनांच्या प्रथम नोंदणीकरिता मोटार निरीक्षकांमार्फत वाहन तपासणीची गरज भासणार नाही. तसेच वाहन विक्रेत्यांनी शुल्क व कर भरल्यानंतर नोंदणी क्रमांक आपोआप जारी होणार आहे. वितरकांनी विक्री केलेल्या वाहनांची कागदपत्रे डिजिटल स्वाक्षरीच्या मदतीने आरटीओ कार्यालयात पाठवावे लागणार आहे. यामुळे कार्यालयातील गर्दी कमी होऊन वेळेची बचत होणार आहे.
तर जावे लागेल आरटीओ कार्यालयात
ज्या अर्जदाराकडे आधार क्रमांक नाही किंवा त्या सेवेचा लाभ घ्यावयाचा नाही. असे अर्जदार पूर्वीप्रमाणे संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज, डॉक्युमेंट अपलोड, शुल्क भरणा स्लॉट बुकिंग करुन कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी जावे लागणार आहे.
कोट...
लर्निंग लायसन्स ऑनलाईन परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्यांना मिळणार आहे. याबाबत शासनाचे पत्र प्राप्त झाले आहे. पुढील आठवड्यापासून जिल्ह्यात ही सुविधा सुरु होणार आहे. कोरोना काळात नागरिकांना आरटीओ ऑफिसला येण्याची गरज भासणार नाही.
गजानन नेरपगार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,