आई राजा उदो उदोच्या जयघोषात तुळजापुरी झाली घटस्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 02:04 PM2018-10-10T14:04:52+5:302018-10-10T14:08:34+5:30
पाच दिवसांची मंचकी निद्रा संपवून आज पहाटेच सिंहासनस्थ झालेल्या तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात दुपारी विधिवत घटस्थापना करून शारदीय नवरात्रीस सुरुवात झाली.
तुळजापूर ( उस्मानाबाद) : पाच दिवसांची मंचकी निद्रा संपवून आज पहाटेच सिंहासनस्थ झालेल्या तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात दुपारी विधिवत घटस्थापना करून शारदीय नवरात्रीस सुरुवात झाली.
तुळजाभवानी मातेच्या घटस्थापणेसाठी महाराष्ट्रासोबतच तेलंगणा, आंध्रा, कर्नाटक राज्यातील भाविकांनी तुळजापूर फुलले होते. मंदिर परिसरात सकाळपासूनच आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो जयघोष सुरू होता. सकाळी अभिषेक, महावस्त्र-अलंकार पूजा झाल्यानंतर नैवेद्य, धूप आरती व अंगाऱ्याचा विधी पार पडला. यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व त्यांच्या पत्नी भारती यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटकलश देवीच्या गाभाऱ्यात आणण्यात आले.
याठिकाणी मंत्रोपचारात व संबळ-तुतारीच्या निनादात घटांची स्थापना करून शारदीय नवरात्रीस सुरुवात करण्यात आली. यानंतर देवीच्या दर्शनासाठी मंदिर भाविकांना खुले करून देण्यात आले. यावेळी येथे दाखल झालेल्या हजारो भाविकांनी तुळजाभवानी देवीचा जोरदार जयघोष केला.