मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी औरंगाबाद, उस्मानाबादला नामांतराचे गिफ्ट!
By चेतनकुमार धनुरे | Published: September 16, 2023 09:19 AM2023-09-16T09:19:30+5:302023-09-16T09:21:25+5:30
राज्याची मंत्रिमंडळ बैठक छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी होत आहे.
धाराशिव : छत्रपती संभाजीनगर येथे आज मंत्रिमंडळ बैठक होऊ घातली आहे. यातून मराठवाड्याच्या पदरी काय पडणार, याकडे सर्वांचे लक्ष असतानाच बैठकीपूर्वी सरकारने दोन शहरांना नामांतराचे गिफ्ट देऊ केले. याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाची उद्या सांगता होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याची मंत्रिमंडळ बैठक छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी होत आहे.
मराठवाड्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. विकासाचा अनुशेषही बाकी आहे. या अनुषंगाने बैठकीतून पदरी काय पडणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. असे असतानाच राज्य शासनाने बैठकीपूर्वी औरंगाबाद व उस्मानाबाद शहर, उपविभाग व जिल्ह्याचे नामांतर अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव असे केले आहे. महसूल व वन विभागाने याबाबत काढलेली अधिसूचना महाराष्ट्र राज्य शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली.