आयएएस अधिकारी असल्याची थाप मारुन केली मुलीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:31 AM2021-05-15T04:31:39+5:302021-05-15T04:31:39+5:30
उस्मानाबाद : विवाह जुळविताना थोडेफार मोठेपणा हा सांगितला जातोच. मात्र, बेकार असताना आयएएस अधिकारी असल्याची थाप मारणे म्हणजे थोडे ...
उस्मानाबाद : विवाह जुळविताना थोडेफार मोठेपणा हा सांगितला जातोच. मात्र, बेकार असताना आयएएस अधिकारी असल्याची थाप मारणे म्हणजे थोडे अतिच झाले. असाच आततायीपणा करुन एकाने उस्मानाबादेतील एका मुलीची फसवणूक केल्याची बाब उघड झाली आहे. दोन वर्षानंतर बिंग फुटल्यावर फसलेल्या मुलीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. यानंतर लागलीच पोलिसांनी शुक्रवारी त्याला बेड्या ठोकल्या.
लोहारा येथील झिंगाडे कुटूंबातील विश्वास नामक मुलाने हा प्रताप करुन दाखविला आहे. घरची सधन परिस्थिती असल्याने एखाद्या मोठ्या अधिकार्याप्रमाणे राहणीमान तो ठेवत असत. साधारणत: अडीच वर्शांपूर्वी आपण आयएएसची परिक्षा उत्तीर्ण झाल्याचा खोटा दावा त्याने सगळीकडे केला होता. त्यामुळे साहजिकच लग्नासाठी अनेकांच्या त्याच्यावर नजरा होत्या. यातच उस्मानाबादेतील एका सधन घरातील सोयरिक चालून आली. मुलीच्या घरच्यांना विश्वास बसेल, अशा थापा त्यावेळी मारल्या गेल्या. त्यामुळे सोयरिक निश्चित झाली. २०१९ मध्ये पुण्यात थाटामाटात लग्नही झाले. नंतर दोघे पती-पत्नी तेथेच वास्तव्यास राहू लागले. वर्षभरानंतर मात्र मुलीला संशय येऊ लागला. मुलाकडे पैशाची चणचण दिसून येऊ लागली. मात्र, मुलाने थापा मारुन वेळ निभावून नेली. दरम्यान, संशय अधिक वाढल्याने मुलीने माहेरी ही बाब कळविली. नंतर तिच्या कुटूंबियांनी चौकशी केली असता तो आयएएस अधिकारी नसल्याचे समोर आले. या प्रकाराने मुलीला धक्काच बसला. तिने तातडीने आनंदनगर ठाणे गाठून पती विश्वास झिंगाडेयाच्या विजयकुमार झिंगाडे, विनोदिनी झिंगाडे (तिघेही रा.लोहारा) व वसुंधरा भागानगरे (रा.पुणे) या चौघांनी संगनमत करुन फसवणूक केल्याची तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन आरोपी विश्वास झिंगाडे यास बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिनकर गोरे करीत आहेत.
कारवर वापरत असे निळा दिवा...
आरोपी विश्वास झिंगाडे हा पत्नीला संशय येऊ नये म्हणून कारवर निळा दिवा वापरत होता. त्यामुळे जवळपास वर्षभर संशय आला नाही. यानंतर पैश्याची चणचण दिसू लागल्यावर मुलीने विचारणा केली असता लॉकडाऊनमुळे वेतन वेळेत होत नसल्याची थाप मारली. नंतर त्याने आपण सहा राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख म्हणून काम पाहतोय. त्यामुळे एकदाच संपूर्ण वेत मिळणार असल्याचे सांगितले. शिवाय, तो दिवसभर घरातच राहत असल्यानेही शंका वाढली होती. चौकशीअंती ती खरी निघाली.