अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन द्या; धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
By चेतनकुमार धनुरे | Published: January 2, 2024 03:38 PM2024-01-02T15:38:39+5:302024-01-02T15:39:21+5:30
तेल शुद्धीकरण केंद्र तसेच डेपोवरुन पेट्रोल-डिझेलची वाहतूक विस्कळित झाली आहे.
धाराशिव : ट्रक, टँकरचालकांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे आपत्तीजनक स्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याने केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन पुरविता यावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व पंप धारकांनी त्यांच्याकडील साठा रिझर्व्ह करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी काढले आहेत. तेल शुद्धीकरण केंद्र तसेच डेपोवरुन पेट्रोल-डिझेलची वाहतूक विस्कळित झाली आहे.
चालकांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा व वस्तूंचा पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होवून आपत्तीजनक स्थिती निर्माण होवू शकते. यावर उपाययोजना करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने जिल्ह्यातील सर्व पंप चालकांनी त्यांच्याकडे असलेला पेट्रोल-डिझेलचा साठा हा राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी काढले आहेत. हे इंधन केवळ आरोग्य विभागात कार्यरत रुग्णवाहिका व व अत्यावश्यक वाहने, पोलिस विभाग, सरकारी वाहने, अग्निशमन वाहने तसेच अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या पुरवठ्यासाठी आवश्यक वाहनांनाच इंधन देता येईल. इतर वाहनांना इंधनाची विक्री करु नये, असे आदेशात नमूद केले आहे.