'एसटी कर्मचार्यांना न्याय द्या'; प्रलंबित मागण्यांसाठी वाहकाचे टॉवरवर चढून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 12:32 PM2023-03-01T12:32:06+5:302023-03-01T12:33:09+5:30
गळ्यात गळफास अडकवून सुरू केले वाहकाने आंदोलन
कळंब ( उस्मानाबाद ) :एसटी कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी कळंब आगारातील वाहक सच्चिदानंद पुरी यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक शहरातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढून, गळ्यात गळफास अडकवून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
एसटी कर्मचार्यांच्या विविध प्रलंबीत मागण्यासाठी मागच्या काही महिन्यात झालेल्या आंदोलनात कळंब आगारातील कर्मचारी अग्रस्थानी होते. आमरण उपोषण, अन्नत्याग अशा कळंब आगार ते मुंबईपर्यंत झालेल्या आंदोलनात येथील काही कर्मचाऱ्यांचा सक्रीय सहभाग होता. दरम्यान, बुधवारी कळंब आगारातील वाहक सच्चिदानंद पुरी यांनी भल्या सकाळी शहरातील बीएसएनएल कार्यालयाच्या आवारातील मोबाईल टॉवर गाठले. सोबतील दोरखंड पण घेतलेला होता. यानंतर टॉवरची एक एक पायरी कापत मोठ्या उंचीवर पोहचत एसटी कर्मचार्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले. सदर कर्मचार्यांनी यापूर्वी पण कळंब येथे आगाराच्या प्रवेशद्वारावरील झाडावर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.
स्वतःच व्हिडीओ केला व्हायरल...
यावेळी आंदोलक सच्चिदानंद पुरी यांनी टॉवरवर उंच ठिकाणी बसल्यानंतर गळ्यात गळफास अडकवलेल्या स्थितीत एक व्हिडीओ तयार करून व्हायरल केला आहे. यामध्ये कर्मचारी, त्यांचे प्रश्न व आपल्या मागणीचा उहापोह केला आहे.
वरिष्ठ अधिकारी दाखल...
एरव्ही वर्दळ नसलेल्या बीएसएनएलच्या परिसरात पुरी यांच्या आंदोलनामुळे बघ्याची गर्दी वाढली आहे. पोलिस दाखल झाले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशीव विभागाच्या विभाग नियंत्रक चेतना शिरवाडकर, आगार प्रमूख मुकेश कोमटवार घटनास्थळी ठाण मांडून आंदोलक पुरी यांच्याशी चर्चा करत होते.
काय आहे व्हिडीओतील संवाद...
खूप दुख वाटतेय, गेल्या दिड वर्षापासून विलिनीकरणाचा लढा लढत आलोत. जवळपास १२४ कर्मचार्यांचा यात गमावले. धूर्त राजकारण्यांनी एसटी कर्मचार्यांच्या लढ्याचा दुरुपयोग केला, राजकीय पोळी भाजून घेतली. यामुळे एसटी कर्मचार्यांना न्याय देवू न शकल्याने मी खचून गेलो आहे. सरकार, धोरणकर्ते व आमच्यातील काही संघटना यांच्यात काय चाललंय ते दिसून येते. यामुळे एसटी कर्मचार्यांना माणसांत बसण्यासाठी गरजेचं असलेल्या सातव्या वेतन आयोग व राज्य शासनाच्या धर्तीवर एसटी कर्मचार्यांना वेतन द्यावे' असे आंदोलक सच्चिदानंद पुरी यांनी व्हिडीओ व्हायरल करून स्पष्ट केले आहे