राज्य सरकारला, जरांगेंना शक्ती दे; तुळजाभवानी देवीला महाआरतीद्वारे मराठा समाजाचे साकडे
By गणेश कुलकर्णी | Published: September 12, 2023 06:19 PM2023-09-12T18:19:55+5:302023-09-12T18:21:26+5:30
हाती भगवा झेंडा आणि माथी भगवी टोपी घालून हे महाआरती करून आंदोलन करण्यात आले.
धाराशिव : सकल मराठा समाज व मराठा क्रांती ठोक मोर्चा यांच्या वतीने मंगळवारी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या महाद्वार परिसरात महाआरती आंदोलन करून ‘राज्य सरकारला मराठा आरक्षण देण्यासाठी सद्बुद्धी व आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगें पाटील यांना शक्ती दे’, असे साकडे घातले.
हाती भगवा झेंडा आणि माथी भगवी टोपी घालून हे महाआरती करून आंदोलन करण्यात आले. महाआरती झाल्यानंतर उपस्थित मराठा बांधवांनी मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला सदबुद्धी दे, मराठा आरक्षणासाठी गेल्या पंधरा दिवसापासून उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांना शक्ती दे, असे साकडे घातले. तसेच ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’, ‘आरक्षण द्या नाहीतर खुर्च्या खाली करा’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘मर मिटेंगे लेकिन आरक्षण लेंगे’, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
यावेळी किशोर गंगणे, अर्जुन साळुंके, स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, राज्य समन्वयक जीवनराजे इंगळे यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी भाषणे केली. या आंदोलनात कुमार टोले, अजय साळुंखे, नरसिंग बोधले, इंद्रजीत साळुंके, राजू भोसले यांच्यासह मराठा बांधव व पुजारी सहभागी झाले होते.