‘ऑफलाईन’ विद्यार्थ्यांना गृहभेटींद्वारे ज्ञानदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:34+5:302021-07-11T04:22:34+5:30
भूम : कोरोना महामारीमुळे मागील वर्षीपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. परंतु, ग्रामीण भागात या ऑनलाईन शिक्षणात अनेक ...
भूम : कोरोना महामारीमुळे मागील वर्षीपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. परंतु, ग्रामीण भागात या ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन येथील जिल्हा परिषद शाळेने आता विद्यार्थ्यांना घरी जाऊन ज्ञानदान करण्यासाठी ‘शिक्षक आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
येथील जिल्हा परिषद शाळेत शहरासह साबळेवाडी, भोनगिरी, गोरमाळा, वरूड, वाकवड, कासारी आदी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. मागील वर्षीपासून कोरोना महामारीमुळे ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ असाच उपक्रम शिक्षण विभागाकडून सुरू आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. परंतु, या शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून ते वंचित राहत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुख्याध्यापक तात्या कांबळे यांनी शाळेतील मोबाईल असणारे व नसणारे विद्यार्थ्यांचे वर्गीकरण केले. यानंतर शिक्षकांना गावे व शहरातील प्रभाग वाटून देण्यात आले. त्यानुसार जे विद्यार्थी ऑफलाईन आहेत त्यांना आठवड्यातील दोन दिवस घरी जाऊन किंवा तीन - चार मुलांना एकत्रित करून शिक्षक अध्यापन करीत आहेत.
सेतू अभ्यासक्रमातील दैनंदिन अभ्यास मुलांना सोडवता यावा यासाठी त्याच्या झेरॉक्स प्रती काढून मुलांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिक्षक मार्गदर्शन करतात. प्रशालेतील शिक्षक डी. जी. पाटील, के .सी. पवार, यू. पी. पायघन, बी. एस. पवार, ए. टी. जोशी, पी. सी. सुरवसे, यू. व्ही. बावकर, हरिष साठे हे शिक्षक नेमून दिलेले गाव व प्रभागात जाऊन अध्यापनाचे कार्य करीत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली असून, पालकांत देखील या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहेत. या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापूसाहेब औताडे व पालकांमधून कौतुक होत आहे.