‘अन्न व औषध’च्या डाेळेझाकीने गुटखा विक्रेत्यांना अच्छे दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:53 AM2021-05-05T04:53:48+5:302021-05-05T04:53:48+5:30
तुळजापूर : कोरोना विघ्नाने सर्वच क्षेत्रांतील व्यावसायिकांना ‘बुरे दिन’चा सामना करण्याची वेळ आली असली तरी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा ...
तुळजापूर : कोरोना विघ्नाने सर्वच क्षेत्रांतील व्यावसायिकांना ‘बुरे दिन’चा सामना करण्याची वेळ आली असली तरी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मात्र अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने ‘अच्छे दिन’ आले आहेत.
काेराेनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी राज्य शासनाने लाॅकडाऊन लागू केले आहे. या काळात उद्याेग, व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या मनाई आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यामुळे व्यापाऱ्यांना बुरे दिन आलेले असतानाच दुसरीकडे गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थ चाेरट्या मार्गाने विकणाऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. चाैका-चाैकांतील टपऱ्या बंद दिसत असल्या तरी बहुतांश मंडळी घरातूनच गुटखा विक्री करू लागली आहेत. १० रुपयांना विकली जाणारी तंबाखूची पुडी २० रुपयांना, एक रुपयांची सुगंधी सुपारी दोन रुपयांना ग्राहकांच्या माथी मारली जात आहे. एका नामांकित कंपनीच्या गुटख्याची पुडी तर चक्क ३० रुपयांना विकली जात आहे. त्यामुळे काेराेनाचा धाेका वाढण्याची भीती तुळजापूरकरांतून व्यक्त हाेत आहे. या अनुषंगाने ओरडही हाेऊ लागली आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासन व पाेलीस यंत्रणेवर त्याचा काहीच परिणाम हाेताना दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारे छप्या पद्धतीने गुटखा विक्रेत्यांचे मनाेबल उंचावले आहे.
चाैकट...
लॉकडाऊनमध्ये पानटपऱ्या नावालाच बंद आहेत. सर्व पानटपरीधारक राहत्या घरातून व्यवसाय करीत आहेत. यात गुटख्याचा व्यवसाय सध्या प्रचंड तेजीत आहे. या सर्व प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलीस डोळेझाक करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणी रवींद्र साळुंके यांनी थेट जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. गुटखा विक्री करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.