भाविकांसाठी खुशखबर, चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर राहणार २२ तास खुले
By गणेश कुलकर्णी | Published: March 17, 2023 06:52 PM2023-03-17T18:52:33+5:302023-03-17T18:52:59+5:30
चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मंदिर प्रशासन कार्यालयात बैठक पार पडली.
तुळजापूर : ३ एप्रिल ते ७ एप्रिल यादरम्यान श्री तुळजाभवानीची चैत्र पौर्णिमा यात्रा साजरी होणार असून, या काळात भाविकांना दर्शनासाठी मंदिर २२ तास खुले ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान भाविकांना चांगल्या सेवासुविधा देण्यासाठी मंदिर प्रशासनासह विविध शासकीय खात्यांनी तत्पर राहावे, अशा सूचना उपविभागीय अधिकारी तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त डॉ. योगेश खरमाटे यांनी दिल्या.
चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मंदिर प्रशासन कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीस मंदिर व्यवस्थापक योगिता कोल्हे, सहायक धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे, अभियंता राजकुमार भोसले, लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे, विश्वास कदम, मुख्याधिकारी अरविंद नातू, कार्यालय अधीक्षक वैभव पाठक, एसटी आगारप्रमुख राजकुमार दिवटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. व्ही. होनमाने, आपत्ती व्यवस्थापनाच्या वृषाली तेलोरे, नायब तहसीलदार पाटील, महंत तुकोजीबुवा, पुजारी मंडळाचे बिपीन शिंदे, भोपी पुजारी मंडळाचे सुधीर कदम, उपाध्ये मंडळाचे अनंत कोंडो यांच्यासह पोलिस व महावितरणचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने चैत्र यात्राकाळात भवानी रोडवरील गर्दी टाळण्यासाठी भाविकांना घाटशीळ वहानतळामार्गे मंदिरात प्रवेश देणे, वाहनतळाजवळील भवानी तीर्थकुंड भाविकांना स्नानासाठी खुले करणे, टाकाऊ माळ-परड्यांचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिरापाठीमागे प्रांगणात तात्पुरत्या अग्निकुंडाची व्यवस्था करणे, यात्राकाळात पुजाऱ्यांनी ड्रेसकोड व ओळखपत्र वापरणे, देवी भाविकांना चांगल्या प्रकारे सेवा देणे, नगर परिषदेने शहर व परिसरातील साफसफाई व स्वच्छतेवर भर देणे, रस्त्यावरील अतिक्रमण हटविणे, पाणपोई उभारणे, शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, सर्व पथदिवे चालू करणे, वाहनतळावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करणे, शहरात वाहने येऊ नयेत यासाठी शहराबाहेरील वाहनतळ चालू करणे, महावितरण कंपनीने वीजपुरवठा अखंड चालू ठेवणे, एसटी महामंडळाने यात्राकाळात बसस्थानक आठवडा बाजार येथे सुरू करणे, भाविकांच्या आरोग्यासाठी आरोग्य खात्याने सर्वतोपरी काळजी घेणे, यासोबतच चैत्र पौर्णिमा काळात मंदिर रात्री १ वाजता उघडून व रात्री वाजता बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.