अफवांतून घडणाऱ्या हिंसाचारास सरकारच जबाबदार; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:01 PM2018-07-04T12:01:47+5:302018-07-04T12:03:14+5:30
गेल्या चार वर्षांत ज्या दंगली, घटना घडल्या, त्यातील क्रुरता यापूर्वी कधीही पाहिली नव्हती़ त्यामुळेच माणसातील सैतान जागे करण्यास आणि अशा हिंसाचारास सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात अॅड़प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी उस्मानाबाद येथे केला़
उस्मानाबाद : अफवांमुळे राज्यभर घडत असलेल्या हिंसाचाराच्या घटना माणसातील माणूसपण संपत चालल्याची प्रतिके आहेत़ गेल्या चार वर्षांत ज्या दंगली, घटना घडल्या, त्यातील क्रुरता यापूर्वी कधीही पाहिली नव्हती़ त्यामुळेच माणसातील सैतान जागे करण्यास आणि अशा हिंसाचारास सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात अॅड़प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी उस्मानाबाद येथे केला़
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी, ओबीसी, मुस्लिम समाजाशी मंगळवारी अॅड़आंबेडकर यांनी संवाद साधला़ यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर त्यांनी हल्ला चढविला़ ते म्हणाले, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमविरोधी राजकारण करीत आहेत़ मुस्लिम समाजाविनाही सत्ता आणू शकतो, हे रुजविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून देशात चालला आहे़ व्यापारी, मुस्लिम समाज, राजकीय विरोधक यांच्यात वेगवेगळ्या माध्यमातून दहशत निर्माण करणे व राज्य करणे, हा केंद्र व राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचा दावाही त्यांनी केला़
आपण वंचितांची मूठ बांधत असताना मला इतरांना का जागे करताय? तुम्ही दलितांचेच राजकारण बघा, असा सल्ला मिळू लागला आहे़ मात्र, मी कोणाच्याही दबावाला बळी पडणारा नाही, असेही आंबेडकर म्हणाले़ बड्या उद्योजकांवर सरकारची चांगलीच मेहेरनजर आहे. अनिल अंबानींच्या अस्तित्वात नसलेल्या कंपनीस १०० लढाऊ विमानांचे कंत्राट कोणत्या आधारावर दिले? हे ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणणाऱ्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी दिले़
पक्षनिधीची चौकशी व्हावी
भाजपच्या पक्ष निधीत अचानक ५०० कोटी रुपये वाढतात़ ते कोणत्या उद्योजकाने दिले, याचा खुलासा व्हावा़ जेणेकरुन त्या उद्योजकाला सरकारने याबदल्यात काय दिले, हेही समोर येईल़ निवडणूक आयोगाने पक्षनिधीची चौकशी करुन ‘दूध का दूध़़’ करावे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली़
अदानीच्या तुरीसाठी शेतकरी सुळावऱ
देशातील बडे उद्योजक अदानींनी आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठ्या प्रमाणात तूर, खरेदी केली होती़ ही तूर देशांतर्गत बाजारपेठेत विक्री व्हायची असल्यानेच सरकार शेतकऱ्यांची तूर खरेदी करीत नसल्याचा आरोप अॅड. आंबेडकर यांनी केला.