'सरकारला सुबुद्धी मिळावी'; आंदोलकांचे कासवपूजन करून तुळजाभवानीला साकडे
By चेतनकुमार धनुरे | Updated: September 18, 2023 14:32 IST2023-09-18T14:30:45+5:302023-09-18T14:32:20+5:30
शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, तुळजापुरात शेतकरी संघटनेचे आंदोलन

'सरकारला सुबुद्धी मिळावी'; आंदोलकांचे कासवपूजन करून तुळजाभवानीला साकडे
तुळजापूर (जि.धाराशिव) : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची सुबुद्धी महाराष्ट्र सरकारला मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पुजारी मंडळाच्यावतीने सोमवारी दुपारी तुळजाभवानीला साकडे घालण्यात आले. महाद्वारासमोरील कासवाचे पूजन करुन यावेळी देवीला महाआरती करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव, ज्वारी, तूर, सोयाबीनचा प्रश्न, पशुधनाचा प्रश्न, दुधाला दरवाढ, पिण्याचे पाणी अशा अनेक समस्या आहेत. पावसाने ओढ दिल्यामुळे पिके वाया गेली आहेत. याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. राज्य सरकार हे मोसमाप्रमाणे बदलत आहे. म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्याची सदबुद्धी सरकारला द्यावी, यासाठी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी साकडे घातल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी आंदोलनावेळी सांगितले.
यावेळी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनीही सरकारच्या धोरणावर कडाडून टिका केली. आंदोलनात स्वाभिमानीचे राजाभाऊ हाके, कल्याण भोसले, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, गुरु भोजने, किशोर गंगणे, अर्जुनअप्पा साळुंके, विजय सिरसट, संजय भोसले, मोहन भोसले, चंद्रकांत नरूळे, अण्णासाहेब साळुंके, विजय भोसले, अण्णा इंगळे, शंतनु जटाळ यांच्यासह पुजारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.