अमूल्य जीवाचे सरकारी मोल लाखात, शेतकरी कुटूंबाची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:32 AM2021-03-19T04:32:03+5:302021-03-19T04:32:03+5:30
उस्मानाबाद : शेतकरी आत्महत्येकडे लाखभराची मदत देणे, यापलिकडे कोणतेही सरकार संवेदनशीलतेने पहायला तयार नाही. घरचा कर्ता गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे ...
उस्मानाबाद : शेतकरी आत्महत्येकडे लाखभराची मदत देणे, यापलिकडे कोणतेही सरकार संवेदनशीलतेने पहायला तयार नाही. घरचा कर्ता गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे कुटूंबाच्या होणार्या होरपळीची भरपाई कसलीही मदत भरुन काढू शकत नाही. तरीही गतवर्षी प्रशासनाने संवेदनशीलता दर्शवीत आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटूंबियांना किमान इतकी तरी मदत होईल, या भावनेतून काम केल्याने पात्र प्रकरणाची संख्या वाढून १ कोटी ६ लाखांची मदत मिळवून दिली.
उस्मानाबाद हा अवर्षणप्रवण भागात मोडत असल्याने शेतकर्यांच्या पाठिशी नैसर्गिक आपत्ती जवळपास दरवर्षीच हात धुवून लागलेली असते. कर्ज, नापिकी, ओला दुष्काळ यातून येणारे नैराश्य हे त्याला आत्महत्येस प्रवृत्त करीत आहे. शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत जिल्हा राज्यात अग्रस्थानी आहे. २०१९ मध्ये १२० तर २०२० साली १२७ शेतकर्यांनी विवंचनेतून देह टाकला. त्यांच्या जाण्याने कुटूंबाची मात्र प्रचंड ससेहोलपट सुरु आहे. गाठिशी काहीच नसल्याने या शेतकर्यांनी हे पाऊल उचललेलेे असते. तेव्हा त्यांच्या कुटूंबांना सरकारी मदतीचा एक मोठा आधार असतो. मात्र, तिथेही अटी व निकष, चौकश्यांचा गतिरोध आडवा येतोच. ते पूर्ण केल्यानंतर कुठे १ लाखाची मदत मिळते. अशी मदत २०१९ मध्ये केवळ ३८ जणांना मिळाला. तब्बल ८२ आत्महत्या या सरकारच्या कसोटीला पात्र ठरल्या नसल्याने त्यांच्या कुटूंबियांना आक्रोश गिळण्याशिवाय पर्याय उरला नाही. २०२० मध्ये मात्र, काहिशी संवेदनशीलता जपली गेल्याचे दिसते. यावर्षी १२७ आत्महत्या झाल्या. त्यापैकी तब्बल १०६ प्रकरणे पात्र ठरवून १ कोटी ६ लाख रुपयांची मदत दिली गेली. १ प्रकरण चौकशीवर आहे, तर २० प्रकरणे अपात्र ठरली.
२०१९
एकूण आत्महत्या : १२०
मदतीसाठी पात्र : ३८
२०२०
एकूण आत्महत्या : १२७
मदतीसाठी पात्र : १०६
उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथील आबाजी जाधव यांना सोसायटीचे कर्ज फेडता न आल्याने व नापिकीमुळे आत्महत्या करावी लागली. पाठिशी पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार सोडून ते गेले. सध्या त्यांच्या पत्नी प्रमिला यांना पक्षाघात झाल्याने घरीच असतात. तर १२ वर्षाची मुलगी घर संभाळते. मुलगा ११ वर्षाचा आहे. शासनाकडून १ लाख रुपये मिळाले, मात्र ते कर्ज फेडण्यातच गेले. प्रचंड हलाखीच्या स्थितीत हे कुटूंब जीवनाचा गाडा ओढत आहे. साडेतीन एकर शेती आहे, पण पडीक. करणारा आता कोणीही नाही.
कळंब तालुक्यातील भोगजी येथील मधुकर सर्जेराव आडसुळ यांनी २०१७ मध्ये कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. यानंतर प्रकरण पात्र ठरवून लाखभराची मदत दिली गेली. शिवाय, प्रशासनाकडून तेव्हा आपणाला काय हवे, एवढी विचारणाच झाली. जनावराच्या गोठ्याचा प्रस्ताव मागवून घेतला. तो अजूनही मंजूर झाला नाही. घरकुलाचीही केवळ आशा दाखवली जातेय. पत्र्याच्या एका खोलीत राहून आता या कुटूंबाने सरकारी मदतीची आशा सोडून देत असलेल्या शेतीतच राबत उदरनिर्वाह सुरु केला आहे.