१६ मार्चपासून सुरू हाेणार पदवी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:56 AM2021-03-13T04:56:47+5:302021-03-13T04:56:47+5:30
उस्मानाबाद, : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा (द्वितीय व तृतीय वर्षाच्या) ...
उस्मानाबाद, : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा (द्वितीय व तृतीय वर्षाच्या) नियोजित वेळापत्रकानुसार १६ मार्चपासूनच सुरू होणार आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचना काटेकोरपणे पाळण्याचे आदेश कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या १६ मार्चपासून प्रथम वर्ष सोडून उर्वरित वर्गाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. सर्व पदवी अभ्यासक्रम (अव्यावसायिक) द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा १६ मार्चपासून सुरू होणार आहेत. दरम्यान, परीक्षा घेण्यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच जिल्हा प्रशासन यांनी यासंदर्भात घ्यावयाची काळजी व सर्व सूचना काटेकोरपणे पाळण्याचे आदेश विद्यापीठाने संबंधित सर्व केंद्रे व महाविद्यालयांना दिले आहेत. एखादा विद्यार्थी आजारी आढळल्यास त्याची वेगळी बैठक व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फिजिकल डिस्टन्स इन सेवन या परीक्षा घेण्याची तसेच त्यासोबत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची सूचनाही कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिल्या आहेत. या काळात औरंगाबादसह चारही जिल्ह्यातील परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. तथापि या काळातील सर्व शनिवार-रविवारी विद्यापीठ परीक्षाचे पेपर ठेवण्यात आलेले नाहीत. यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. दरम्यान, ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना ११ ते १४ मार्चदरम्यान ऑनलाईन मॉक टेस्ट देता येणार आहे. ज्यांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांनाच ही टेस्ट देणे गरजेचे आहे. ऑफलाईन विद्यार्थ्यांना स्वत:चे महाविद्यालय हेच ‘होम सेंटर‘ असणार आहे. दरम्यान, प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रम परीक्षेसोबतच १ एप्रिलपासून होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली.
चाैकट...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने ऑनलाईन ‘पीएच. डी‘ एंट्रन्स टेस्ट अर्थात पेट (पेपर दुसरा) येत्या शनिवारी घेण्यात येणार आहे. सहा हजार ३८३ विद्यार्थी पहिला पेपर उत्तीर्ण झाले आहेत. आता १३ मार्च रोजी दुसरा पेपर घेण्यात येईल. या सर्व विद्यार्थ्यांना ही ११ व १२ मार्च रोजी मॉक टेस्ट देणे गरजेचे आहे. मॉक टेस्ट ही विद्यार्थ्यांना पहिल्या पेपरप्रमाणेच मोबाईल, लॅपटॉप अथवा संगणकावर देता येईल, असे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी कळविले आहे.