द्राक्ष निर्यात घटली, दरातही घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:40 AM2021-02-25T04:40:06+5:302021-02-25T04:40:06+5:30
फोटो (२३-२) संतोष मगर तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी मंडळ कृषी कार्यालयांतर्गत गावातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात द्राक्षाची परदेशात निर्यात ...
फोटो (२३-२) संतोष मगर
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी मंडळ कृषी कार्यालयांतर्गत गावातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात द्राक्षाची परदेशात निर्यात होते. परंतु, यंदा कोरोनाच्या धास्तीने आतापर्यंत केवळ दीडशे टन द्राक्षाची निर्यात झाली असून, याला दरही अत्यल्प मिळत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांत चिंता व्यक्त होत आहे.
काटी मंडळात २५०० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागेची लागवड करण्यात आली आहे. विशेषत: विविध जातीची ही द्राक्षे माळरानावर पिकवली जातात. दरवर्षी या भागातून अडीच ते तीन हजार हेक्टरवरील द्राक्ष परदेशात निर्यात होत असतात. याला दरही शंभर रुपयांपेक्षा अधिक मिळतो. यंदाही फेबुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून द्राक्ष काढणीला प्रारंभ झाला. परंतु, आतापर्यंत केवळ १५० टन द्राक्षे युरोप देशात निर्यात झाली असून, याला दरही ७० ते ८० रुपये प्रतिकिलो मिळाला. शिवाय, पुढील काळात कोरोनाचा संसर्ग वाढेल, या धास्तीने व्यापारी बांधावर केवळ तीस रुपये दराने द्राक्षाची मागणी करीत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती पाहता, द्राक्ष उत्पादनातून हातात काहीच राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षी कोरोनाचे लॉकडाऊन जाहीर झाल्याने हजारो टन द्राक्षे निर्यात होऊ शकली नाहीत. बाजारपेठा बंद पडल्याने शेतात द्राक्षे पडून राहिली. यंदाही पुन्हा कोरोनाचे संकट उभे ठाकल्यामुळे द्राक्षे धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. द्राक्षाचे क्षेत्र वाढले, पण योग्य भाव मिळत नसल्याने द्राक्षाची गोडी उत्पादकांना आंबटच वाटणारी ठरत आहे.
चौकट....
एकरी ३ लाखांचा खर्च
द्राक्ष बागेसाठी लागवड ते फळधारणा असा एकरी ३ लाख रुपयांचा खर्च येतो. एकरी मिळणारे उत्पादन व मिळणारा भाव याचा ताळमेळ पाहता यातून केवळ खर्च भागू शकतो. शिल्लक काही राहत नाही. निर्यात होणाऱ्या द्राक्षाला किमान शंभर रुपये प्रतिकिलो दर मिळाला पाहिजे. कोरोनाचा उद्रेक होईल या भीतीपोटी व्यापारी द्राक्षांना कवडीमोल दराने मागणी करीत आहेत. यामुळे द्राक्ष उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता शेतकरी राजाभाऊ मोटे यानी व्यक्त केली.
चौकट...
काटी मंडळ कृषी कार्यालयांतर्गत २२ गावांतील अडीचशेहून अधिक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्ष परदेशात निर्यात करण्यासाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे. परंतु, आतापर्यंत केवळ दीडशे टन द्राक्षे विक्रीसाठी युरोपमध्ये गेली आहेत.
- आनंद पाटील, मंडळ कृषी अधिकारी, काटी