दर उतरल्याने द्राक्ष बागायतदार अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:49 AM2021-02-23T04:49:47+5:302021-02-23T04:49:47+5:30
भूम: शहारासह तालुक्यात १७ व १८ फेब्रुवारी सलग दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील चिंचपूर (ढगे) येथील ...
भूम: शहारासह तालुक्यात १७ व १८ फेब्रुवारी सलग दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील चिंचपूर (ढगे) येथील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाण्यामुळे खराब झालेल्या या द्राक्षांना आता दरही कमी मिळणार असल्याने द्राक्ष उत्पादक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
तालुक्यातील चिंचपूर (ढगे) शिवारात एकूण पाचशे हेक्टर बागायती क्षेत्र असून, यातील २३० हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागेची लागवड झालेली आहे. येथील द्राक्ष दिल्ली, हैदराबाद, उत्तर प्रदेश यासह विविध राज्यात जातात. यामुळे माल काढणीला येण्यापूर्वीच व्यापारी फळाची पाहणी करून भाव निश्चित करून जातात. यंदाही व्यापाऱ्यांनी द्राक्षाची पाहणी करून भाव ठरवले होते; परंतु अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष भिजले. या फळास माश्या लागत असून, वातावरणात बदल झाल्याने विविध रोगांनीही डोके वर काढले आहे. त्यातच फळ खराब झाल्याने भाव कमी मिळून आर्थिक फटका बसणार असल्याने येथील शेतकरी संकटात सापडले आहेत.
चौकट.........
कर्ज काढून लावली बाग
येथील हिरालाल ढगे या शेतकऱ्यानेदेखील बँकेकडून सहा लाख रुपयांचे कर्ज घेऊन मोठ्या आशेने द्राक्षाची बाग लावली होती. यात त्यांना यशही आले होते. १० ते १५ दिवसात हे फळ काढणीला येणार होते. व्यापाऱ्यांनी या बागेचा आठ लाख रुपयात सौदा ठरविला होता; परंतु सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस झाल्याने आता उत्पन्न तर दूरच; परंतु केलेला खर्चदेखील निघणे अवघड झाले आहे. अशीच काहीशी अवस्था गावातील इतर शेतकऱ्यांचीदेखील झाली असून, प्रशासनाने नुकसानाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
चिंचपूर ढगे हे द्राक्ष उत्पादनासाठी तालुक्यात अग्रेसर आहे. सर्रास शेतकरी उत्पन्न चांगले मिळते म्हणून बँकेचे कर्ज काढून द्राक्ष बाग लावतात; परंतु यावेळी अवकाळी पाऊस झाल्याने गावातील प्रत्येक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- विशाल ढगे, ग्रामपंचायत गट नेते, चिंचपूर ढगे.