शेतकऱ्यांसाठी यंदाही द्राक्षे आंबटच !; बदलत्या वातावरणाने उत्पादनात झाली घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 03:52 PM2019-01-09T15:52:34+5:302019-01-09T15:57:48+5:30
पाण्याअभावी उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने मागणी इतका पुरवठा होण्याची शक्यता कमीच आहे
उस्मानाबाद : मागील चार-पाच वर्षांपासून असमान पर्जन्यमान, हवामानातील बदल, गारपीट, अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादनात कमालीची घट झाली आहे़ शाश्वत पैसा मिळवून देणाऱ्या या फळपीकाला यंदा युरोपीय व अरब राष्ट्रातून चांगली मागणी आली आहे़ मात्र, पाण्याअभावी उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने मागणी इतका पुरवठा होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक महादेव वडणे यांनी दिली़
मागणी वाढली, उत्पादन घटले
उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यामध्ये सुमारे ३ हजाराहून अधिक क्षेत्रावर द्राक्षाची लागवड यावर्षी झालेली आहे़ गतवर्षीच्या चांगल्या पावसामुळे मोडलेल्या बागा शेतकऱ्यांनी पुनरुज्जिवीत केल्या होत्या़ मात्र, यावर्षी पावसाने दगा दिला व शेतकरी अडचणीत आला, असे महादेव वडणे यांनी सांगितले़ या भागातील द्राक्षे युरोपीय, अरब देशात तसेच बांग्लादेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात़ यंदा या राष्ट्रातून दरवर्षीपेक्षा जास्त मागणी आलेली आहे़ आपल्या भागात एकरी सरासरी १५ टनापर्यंत द्राक्षाचे उत्पादन होते़ मात्र, पाऊस कमी झाल्याने पाण्याची कमतरता चांगलीच जाणवत आहे़ अपुऱ्या पाण्यामुळे सरासरी उत्पादन गाठण्याची शक्यता कमी झाली आहे़ त्यातच अचानक थंडी वाढली़ तापमान १५ अंश सेल्शियसपेक्षा खाली उतरल्यास त्याचा परिणाम द्राक्ष मण्यांच्या फुगवणीवर होतो़ सध्याच्या थंडीमुळे ही फुगवण थांबलेली आहे़ आता तापमान वाढले तरी, काहि अंशी झालेले नुकसान भरुन निघण्याची शक्यता नाही, असे मतही वडणे यांनी व्यक्त केले़
या वर्षी वाढीव दर मिळणार
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या द्राक्ष उत्पादक शेतकरी टँकरने पाणी देऊन बागा जगवीत आहे़ हातातोंडाशी आलेला घास जावू नये, यासाठी ही धडपड सुरु आहे़ एकरी किमान एक टँकर पाणी सध्या लागते़ या टँकरची किंमत २ ते अडीच हजार रुपये इतकी आहे़ हा अतिरिक्त खर्च वाढला आहे़ मागणी वाढल्यामुळे दरही चांगला मिळण्याची शक्यता आहे़ गतवर्षी स्थानिक बाजारपेठेत ४० रुपये तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ६० रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत दर मिळाला होता़ यावर्षी तो वाढेल, अशी अपेक्षा महादेव वडणे यांनी व्यक्त केली़
बागांच्या पुनरुज्जिवनासाठी मदत करावी
गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे़ ऐन काढणीच्या हंगामात अवकाळी पाऊस, गारपीट होवून मोठे नुकसान झाले़ त्यामुळे हा शेतकरी आर्थिक अडचणीत आहे़ शासनाने जे शेतकरी टँकरच्या पाण्याने बागा जगवीत आहेत, त्यांना अनुदान द्यावे़ शेततळ्याला १०० टक्के अनुदान व हवे त्या आकारात शेततळे मंजूर करावे, लातूरच्या धर्तीवर उस्मानाबाद जिल्ह्यातही पणनचे कोल्ड स्टोरेज व्हावे व द्राक्ष बागांच्या पुनरुज्जिवनासाठी शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही वडणे यांनी केली़