‘क्यूआर काेड’द्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:36 AM2021-09-05T04:36:52+5:302021-09-05T04:36:52+5:30

कळंब - जिल्ह्यातील प्रमुख कृषी बाजारपेठ असलेल्या कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सचिव म्हणून दत्तात्रय वाघ यांनी सूत्रे ...

Guidance to farmers through QR CAD | ‘क्यूआर काेड’द्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

‘क्यूआर काेड’द्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

googlenewsNext

कळंब - जिल्ह्यातील प्रमुख कृषी बाजारपेठ असलेल्या कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सचिव म्हणून दत्तात्रय वाघ यांनी सूत्रे हाती घेतली. लागलीच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी ‘क्यूआर कोड’ प्रणाली चालू करण्याचा संकल्प जाहीर केला आहे.

कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेली बाजार समिती म्हणून ओळखली जाते. जवळपास २९ एकर क्षेत्रावरील बाजार समितीच्या मार्केट यार्डात शेतीमाल खरेदी-विक्रीसह विविध व्यवसाय थाटले आहेत. कळंबच्या इतर बाजारपेठेसही या मोंढ्याचा मोठा आधार आहे. अशा प्रमुख संस्थेचे सचिव ए. बी. खापे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. यानंतर या महत्त्वाच्या ‘चेअर’वर कोण विराजमान होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हा विषय यार्डातून डीडीआर, पणनच्या दरबारात पोहोचला होता. अखेर सचिव पदावर दत्तात्रय वाघ यांची नियुक्ती केली. त्यांनी नुकतीच आपल्या पदाची सूत्रे हातात घेतली असून, बाजार समितीच्या मालमत्तेचे जतन करत मोंढ्यातील उलाढाल वाढविण्यावर, शेतकऱ्यांना सुविधा देण्यावर भर दिला जाणार असल्याचे सुतोवाच केले आहे. यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधत मुख्य बाजारपेठेसह उपबाजारपेठेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

चौकट...

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी हायटेक प्रणाली...

दरम्यान, शेतकऱ्यांना पिकांच्या पेरणी ते काढणीपश्चात माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी क्यूआर कोड (क्विक रिस्पॉन्स) प्रणालीचा वापर करण्याचा विचार बाजार समितीने सुरू केला आहे. यात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत, अंमलबजावणीचे स्वरूप काय असावे, याविषयी माहिती घेतली जात असून यासंबंधी निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळाची आठ दिवसाच्या आत बैठक घेतली जाणार असल्याचे सभापती रामहरी शिंदे, सचिव दत्तात्रय वाघ यांनी कळविले आहे.

Web Title: Guidance to farmers through QR CAD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.