गुळाला आला भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:24 AM2021-06-06T04:24:31+5:302021-06-06T04:24:31+5:30
भूम : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिक गुळाचा समावेश असलेल्या आयुर्वेदिक काढ्यावर भर देत असल्याने गुळाची ...
भूम : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिक गुळाचा समावेश असलेल्या आयुर्वेदिक काढ्यावर भर देत असल्याने गुळाची मागणी वाढली आहे. त्यातच दुसरीकडे कोरोनामुळे बहुतांश ठिकाणची गुऱ्हाळे बंद आहेत. त्यामुळे बाजारात गुळाला चांगलाच भाव येत असल्याचे चित्र आहे.
कोरोना प्रादुर्भाव होऊ नये तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचा वापर अनेकजण करताना दिसून येत आहेत. या काढ्यात विविध पदार्थांबरोबरच गुळाचादेखील वापर होतो. परंतु, राज्यातील प्रमुख पेठांमधील गुऱ्हाळे बंद झाल्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. परिणामी पूर्वी ४५० रुपयांत दहा किलो मिळणाऱ्या गुळासाठी आता पाचशे रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही गुळाच्या दरात किलोमागे पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे.
भूम तालुक्यात चिंचोली तसेच वाशी येथे गुऱ्हाळघरे आहेत. शिवाय मराठवाड्यात गुळाची मोठी बाजारपेठ म्हणून लातूरकडे पाहिले जाते. परंतु, तेथील गुऱ्हाळेदेखील सध्या बंद आहेत. त्यातच सेंद्रिय गुळाला जास्त मागणी असल्याने शहरातील व्यापारी पुणे येथून हा गूळ खरेदी करीत आहेत.
चौकट......
मागील काही दिवसांत गुळाला मागणी वाढली आहे. परंतु, आपल्या भागातील गुऱ्हाळे बंद आहेत. शिवाय, इंधन दरही वाढल्यामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. परिणामी गुळाचे दर वाढले आहेत.
- बाबू हुरकुडे, व्यापारी, भूम