गुंजोटीकरांना ‘पीएचसी’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:31 AM2021-04-13T04:31:08+5:302021-04-13T04:31:08+5:30

गुंजोटी : सोळा ते सतरा हजार लोकसंख्या असलेल्या गुंजोटी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजुरी मिळून सात ...

Gunjotikars waiting for ‘PHC’ | गुंजोटीकरांना ‘पीएचसी’ची प्रतीक्षा

गुंजोटीकरांना ‘पीएचसी’ची प्रतीक्षा

googlenewsNext

गुंजोटी : सोळा ते सतरा हजार लोकसंख्या असलेल्या गुंजोटी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजुरी मिळून सात वर्षांहून जास्त काळ उलटला असून, यासाठी एकाने दोन एकर जागादेखील ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली. परंतु, प्रत्यक्षात काम मात्र अद्यापही सुरू झालेले नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून गुंजोटी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे. यासाठी गुंजोटीसह औराद, कदेर, कसगी, मुरळी, भुसणी, गुंजोटीवाडी, कसगीवाडी, नगराळ या गावचे ठराव घेऊन गुंजोटी ग्रामपंचायतीने शासनाकडे जवळपास दहा वर्षांपूर्वी सादर केले होते. यानंतर २००८ साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख येथे एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर यांनी गुंजोटीच्या आरोग्य केंद्राबाबत हिरवा कंदील दाखविला होता. त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. ग्रामपंचायत पदाधिकारी व गावपुढाऱ्यांनी यासाठी पाठपुरावा केल्यानंतर उमरगा येथील बंद पडलेले नागरी रुग्णालय गुंजोटीला सुरू करून ‘दुधाची तहान ताकावर’ भागविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.

दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ग्रामपंचायतीच्या विनंतीवरून गावातील एका नागरिकाने गावाशेजारील आपली दोन एकर जागाही ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर पाठपुरावा करून गुंजोटीतील प्राथमिक आरोग्य केंद्राला सन २०१३ मध्ये शासनाकडून मंजुरी मिळाली होती. परंतु, मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मात्र अद्यापही सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे, मागील वर्षी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांना माजी सरपंच सुशीलाबाई देशमुख यांच्या विनंतीवरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना शिफारसही केली होती. तसे प्रस्तावही पुन्हा ग्रामपंचायतीच्या वतीने मुंबई येथे जाऊन दिले होते. मात्र, अजूनही आरोग्य केंद्र उभारणीसाठी निधी उपलब्ध झालेला नाही.

उपचारासाठी होतोय २५ किमीचा प्रवास

सध्या गुंजोटी व परिसरातील गावे मूळज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडली गेली आहेत. त्यामुळे कसगी, कदेर, मुरळी व वाडी तांड्यावरील नागरिकांना उपचारासाठी २५ ते ३० किमी अंतर कापून मूळजला जावे लागते. गुंजोटीला आरोग्य केंद्र उभारल्यास या जवळच्या गावांना सोयीचे ठरणार आहे.

कोट....

प्राथमिक आरोग्य केंद्राला जागा उपलब्ध होऊनही बराच काळ उलटला. परंतु, लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. गावच्या व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी येथील आरोग्य केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे.

- रवींद्र देशमुख, ग्रामपंचायत सदस्य

निजाम राजवटीपासून उमरगा तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव म्हणून मराठवाड्यात गुंजोटीची ओळख आहे. सामाजिक जाणिवेतन एका दानशूर व्यक्तीने आरोग्य केंद्राला जागा उपलब्ध करून दिली. मात्र, निधीअभावी अजून कामाला सुरुवात झाली नाही.

- राजेंद्र गायकवाड, माजी उपसरपंच

निधी मिळविण्यासाठी वकरी व गावपुढारी यांचे प्रयत्न कमी पडत आहेत. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन येऊन आंदोलन उभारण्याची गरज आहे. तरच गुंजोटीकरांची प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी पूर्णत्वास जाईल,असे वाटते.

- पिंटू साखरे, भाजप शाखाध्यक्ष

गुंजोटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकाम निधीसाठी राजकारण आड येत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असून, येथील ग्रामपंचायत देखील सेनेकडे आहे. त्यामुळे आता निधी मिळण्यास काहीच अडचण नाही.

- सुशीलाबाई देशमुख, माजी सरपंच

गुंजोटीसह आसपासच्या गावाची लोकसंख्या तीस हजारांहून जास्त आहे. त्या नागरिकांच्या सोयीसाठी गुंजोटी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र महत्त्वाचे व सोयीचे ठरणार आहे.

- सुरेश सूर्यवंशी, ग्रा. पं. सदस्य

सध्या गुंजोटी येथे नागरी दवाखाना कार्यान्वित आहे. मात्र, वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे. त्यासाठी गुंजोटी येथील पुढाऱ्यांनी एकत्र येऊन निधीसाठी प्रयत्न करून गुंजोटी व परिसरातील जनतेची सोय करावी.

- सुनील पाटील, ग्रामस्थ

Web Title: Gunjotikars waiting for ‘PHC’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.