आई तुळजाभवानीचं दर्शन, आरतीही केली; अमित ठाकरेंचं मिशन मराठवाडा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 03:20 PM2022-10-07T15:20:10+5:302022-10-07T15:28:01+5:30
अमित ठाकरे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली, त्यानंतर ते तुळजापुरात कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी रवाना झाले.
उस्मानाबाद - मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. 06 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर असा दहा दिवसांचा त्यांचा दौरा असणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून दौऱ्याची सुरुवात होऊन औरंगाबादला समाप्ती होणार आहे. त्यानुसार, अमित ठाकरे यांनी आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतले. सकाळी आरती करीत अमित ठाकरे यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले.
अमित ठाकरे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली, त्यानंतर ते तुळजापुरात कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी रवाना झाले. त्यांच्या दौऱ्यातील नियोजनानुसार अमित ठाकरे आज मुक्कामी लातूर येथे जाणार आहेत. त्यानंतर, नांदेड, हिंगोली ,परभणी, बीड, जालना व संभाजीनगर असा सात दिवस त्यांचा मराठवाडा दौरा असणार आहे. हा दौरा संघटनात्मक बांधणीसाठी असून माध्यमांशी बोलणार नसल्याचं अमित ठाकरे यांनी तुळजापुरात सांगितलं. दरम्यान, यौ दौऱ्यातून अमित ठाकरे हे पक्षाच्या बैठका घेत विद्यार्थी सेनेची बांधणी करणार आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता मराठवाड्यातील मनसैनिकांसाठी हा दौरा महत्वाचा ठरणार आहे.
असा असेल दौरा
याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत या दौऱ्याची माहिती दिली होती. 'येतोय नवनिर्माणाची वाज्रमुठ बांधण्यासाठी, महासंपर्क अभियान सहावा टप्पा, असे ट्विट राजू पाटील यांनी केले होते. तसेच, दौऱ्याची सुरवात उस्मानाबाद जिल्ह्यातून होणार असून, ज्यात 6 ऑक्टोबर तुळजापूर, 7 ऑक्टोबर उस्मानाबाद, 8 ऑक्टोबर लातूर, 9 ऑक्टोबर नांदेड, 10 ऑक्टोबर हिंगोली, 11 ऑक्टोबर परभणी, 12 ऑक्टोबर बीड, 13 ऑक्टोबर जालना, 14 – 15 ऑक्टोबर औरंगाबाद असा हा दौरा असणार आहे.