शहरातील निम्म्या लोकांना मिळाला पहिला डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:37 AM2021-08-21T04:37:07+5:302021-08-21T04:37:07+5:30
उस्मानाबाद : पदरी पडतील तितक्या लसींचे योग्य नियोजन करीत त्या वाया जाणार नाहीत याची काळजी घेऊन जिल्ह्यात लसीकरण सुरू ...
उस्मानाबाद : पदरी पडतील तितक्या लसींचे योग्य नियोजन करीत त्या वाया जाणार नाहीत याची काळजी घेऊन जिल्ह्यात लसीकरण सुरू आहे. त्यामुळे शहरी भागातील निम्म्या लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस मिळू शकला. ५१ टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण करून हा एक मोठा टप्पा आरोग्य विभागाने गाठला असला तरी लसींच्या अभावामुळे दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा लागून आहे.
कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जिल्ह्यातील शहरी भागांतील २ लाख ८९ हजार ९८ नागरिक पात्र आहेत. यामध्ये सर्वाधिक १ लाख ६८ हजार ६४० नागरिक हे १८ ते ४४ वयोगटातील आहेत. यापैकी ३९ टक्के म्हणजेच ६५ हजार ९९२ नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १२ हजार ९१५ इतकी आहे. ४५ ते ५९ वयोगटातील ८० हजार ३०५ नागरिकांना लस द्यायची आहे. यापैकी २९ हजार २५८ जणांना पहिला, तर त्यातील १६ हजार ६२१ जणांना दुसराही डोस मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण चांगले झाले आहे. आतापर्यंत शहरी भागातील २७ हजार ८१६ जणांना पहिला, तर यातील १७ हजार ४९५ जणांना दुसराही डोस मिळू शकला आहे. एकूण ४० हजार १५३ ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे.
ग्रामीणचीही टक्केवारी वधारतेय...
लसीचे सर्वाधिक लाभार्थी ग्रामीण भागात आहेत. एकूण ९ लाख ७० हजार १५९ नागरिकांना लस द्यायची आहे. यापैकी २ लाख ३७ हजार ७८१ नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे, तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ७९ हजार ४९८ आहे. ग्रामीण भागातील ७५ टक्के ज्येष्ठ नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला, तर ५ टक्केच तरुण व प्रौढांना पहिला डोस मिळाला आहे.
४ लाखांकडे सुरू आहे कूच...
जिल्ह्यात लस घेण्यासाठी १२ लाख ५९ हजार २५७ नागरिक पात्र आहेत. यापैकी आतापर्यंत ३० टक्के म्हणजेच ३ लाख ८५ हजार ७१५ जणांना पहिला डोस मिळाला आहे. येत्या पाच-सहा दिवसांमध्ये ४ लाखांचा आकडा ओलांडला जाईल. दरम्यान, यातील १ लाख ४२ हजार ९५२ जणांना दुसराही डोस मिळाला आहे. एकूण लाभार्थ्यांच्या तुलनेत दोन्ही डोस मिळविलेल्या नागरिकांची टक्केवारी ११.३५ आहे.