उमरग्यात अतिक्रमणांवर चालविला हाताेडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:26 AM2021-01-02T04:26:51+5:302021-01-02T04:26:51+5:30
फोटो (१-१) समीर सुतके उमरगा : उमरगा शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी ३१ डिसेंबर ...
फोटो (१-१) समीर सुतके
उमरगा : उमरगा शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झालेले अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. रस्त्यातील शेड, फलक, पानटपऱ्या काढण्यात आल्या. रस्त्यावरील हातगाडे, भाजी विक्रेते, रिक्षाचे थांबे हटविल्याने शहरातील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
उमरगा शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हातगाडे, फेरीवाले, रिक्षांचे थांबे, दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हा जटिल प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे. अतिक्रमण काढण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले; पण ते तात्पुरत्या स्वरूपात झाले. त्यांनी महामार्ग प्राधिकरण, पालिका व व्यापाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. अतिक्रमणे हटविण्याविषयी झालेल्या चर्चेत छोट्या व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे, आठवडी बाजाराच्या दिवशी राष्ट्रीय महामार्गावर होणारी भाजी विक्री थांबविणे, हातगाडे, दुचाकीसाठी पार्किंग व्यवस्था, चारचाकी वाहन थांब्यासाठी पर्यायी जागा, भाजी लिलावासाठी जागा, रिक्षांसाठी पर्यायी जागा यासंदर्भात चर्चा झाली होती. जुन्या सरकारी दवाखान्याच्या जागेत भाजीविक्री, तर भाजी लिलाव मूळज रोडलगत असलेल्या आठवडी बाजारात होईल. दुचाकीची पार्किंग गटशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाच्या मैदानात असेल, असे बैठकीत ठरले. दरम्यान, गुरुवारी हटविण्यात आलेल्या छोट्या व्यावसायिकांसाठी निश्चित केलेल्या पर्यायी जागेत कुठल्याही स्वरूपाच्या सुविधा नाहीत, तसेच ही जागा नागरिकांसाठीही गैरसाेयीची आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. यावेळी मुख्य रस्त्यावर असलेले शेड, फलक, पानटपऱ्या काढण्यात आल्या. रस्त्यावरील हातगाडे, भाजीविक्रेते, रिक्षाचे थांबे हटविल्याने शहरातील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला. मात्र, शहरातील पतंगे रोड, महादेव गल्ली, आरोग्यनगरी, शिवपुरी रोड, शिवाजी चौक आदी रस्त्यांवरील अतिक्रमण कधी हटविणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.