उकळत्या तेलात बुडविला हात, पतीसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:33 AM2021-02-24T04:33:41+5:302021-02-24T04:33:41+5:30
परंडा शहरालगतच्या वस्तीवर राहणाऱ्या पीडित महिलेस परंडा येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचारी व त्याचा साथीदार या दोघांनी ...
परंडा शहरालगतच्या वस्तीवर राहणाऱ्या पीडित महिलेस परंडा येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचारी व त्याचा साथीदार या दोघांनी ११ फेब्रुवारी रोजी मोटारसायकलवर बसवून परंडा-कुर्डुवाडी रोडवरील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेले. तेथे महिलेस चार दिवस डांबून ठेवून तिच्यावर त्या दोघांनी अत्याचार केला. तसेच याबाबत कोणास सांगितल्यास जीवे मारू, अशी धमकी दिली. पीडित माहिला घरी आल्यावर तिच्या पतीने चारित्र्यावर संशय घेऊन चारित्र्य सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलातून पैशाचे नाणे काढण्यास भाग पाडले. यामुळे महिलेचा हात गंभीर भाजला गेला. तिच्यावर परंडा येथीलच एका खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार केला. एवढ्यावरच न थांबता पतीने या घटनेची मोबाइलवर क्लिप तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पीडित माहिलेस सोबत नेऊन सोलापूर ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार सोलापूर पाेलिसांनी त्याची नोंद घेऊन घटना परंडा पोलिसांच्या हद्दीत घडली असल्याने हा गुन्हा झिरोने परंडा येथे ऑनलाइन वर्ग करण्यात आला. दरम्यान, या घटनेतील महिलेवरील अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास हे उपविभागीय पोलीस आधिकारी डाॅ. विशाल खंबे हे करीत आहेत. तर अघोरी प्रथेचा पतीवर दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे हे करीत आहेत. या प्रकरणातील पीडितेचा आरोपी पती व तिच्यावर अत्याचार करणारा एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तर आरोपी पोलीस कर्मचारी अद्याप अटकेत नाही.