धोंड्याच्या महिन्यात सोन्याची अंगठी दिली नाही म्हणून छळ; विवाहितेने आयुष्य संपवलं
By बाबुराव चव्हाण | Published: August 25, 2023 09:39 PM2023-08-25T21:39:19+5:302023-08-25T21:39:57+5:30
सततच्या त्रासाला कंटाळून अखेर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विवाहित तरूणी सुमन हिने बालाजी नगर भागातील आपल्या राहत्या घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली
उमरगा (जि. धाराशिव) -धाेंडे ताटात एक ताेळ्याची साेन्याची अंगठी व कार घेण्यासाठी दाेन लाख रूपये माहेरहून घेऊन यावेत म्हणून सासरच्यांनी केलेला छळ असह्य झाला. सततच्या जाचाला कंटाळून विवाहित तरूणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे उमरगा शहरातील बालाजीनगर परिसरात घडली.
सुमनचा विवाह उमरगा येथील अमोल अशोक काळे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळीने कार घेण्यासाठी माहेरहून दाेन लाख रूपये घेऊ ये, म्हणून तगादा लावण्यास सुरूवात केली. पैशासाठीचा हा छळ असह्य झाला असतानाच धाेंडे ताटात एक ताेळे वजनाच्या सुवर्ण अंगठीसाठीही जाचहट केला जावू लागला. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विवाहित तरूणी सुमन हिने बालाजी नगर भागातील आपल्या राहत्या घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली, अशी फिर्याद मयत सुमनचे वडील व्यंकट माणिक दुधभाते यांनी उमरगा पाेलीस ठाण्यात दाखल केली. त्यावरून पती अमोल अशोक काळे, दीर अक्षय अशोक काळे, सासरा अशोक काळे, सुनिता अशोक काळे, गोकर्णा बनसोडे व आजी सासू कस्तुरबाई अशा सहाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.