लोहाऱ्यात हायस्कूलच्या लिपिकास मारहाण; तिघांविरूध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 05:06 PM2018-12-29T17:06:34+5:302018-12-29T17:07:33+5:30
ही घटना २० डिसेंबर रोजी लोहारा येथे घडली़
लोहारा (उस्मानाबाद) : शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूलमधील वरिष्ठ लिपीकास मारहाण केल्याप्रकरणी संस्थेच्या माजी पदाधिकाऱ्यांसह तिघांवर लोहारा पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० डिसेंबर रोजी लोहारा येथे घडली़
लोहारा शहरातील वसंतदादा हायस्कूलमध्ये अंकुश शिंदे हे वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहेत. २० डिसेंबर रोजी शिंदे शाळेच्या कार्यालयात कामकाज करत बसले होते. त्यावेळी या शाळेचे माजी पदाधिकारी असलेले दिनकर जावळे-पाटील यांनी लिपीक अंकुश शिंदे यांना शंकराव जावळे-पाटील वरिष्ठ महाविद्यालयाच्या कार्यालयात बोलाविले. त्यावेळी जावळे-पाटील यांनी लिपीक शिंदे यांना नितीन जावळे-पाटील यांच्या वैद्यकीय देयकाचे काय झाले? अशी विचारणा केली
त्यावेळी त्यांनी काम चालू असल्याचे सांगितले़ मात्र कार्यालयात बसलेले विनोद जावळे व प्रमोद जावळे यांनी लिपीक शिंदे यांना काठीने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर दिनकर जावळे-पाटील यांनीही लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तुला शाळेतून काढून टाकतो. माझी पोलिसांत तक्रार केल्यास तुला व तुझ्या कुटुंबांना जीवे मारू, अशी धमकी दिल्याचे लिपीक अंकुश शिंदे यांनी लोहारा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे़ शिंदे यांच्या तक्रारीवरून दिनकर जावळे-पाटील, प्रमोद जावळे, विनोद जावळे या तिघाविरुध्द शुक्रवारी रात्री लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.