रस्त्यालगतच्या उकिरड्यांमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:00 AM2021-02-18T05:00:00+5:302021-02-18T05:00:00+5:30
प्रभाग : २ बालाजी बिराजदार लोहारा : शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये अंतर्गत रस्ते, गटारीचा प्रश्न मार्गी लागला असला ...
प्रभाग : २
बालाजी बिराजदार
लोहारा : शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये अंतर्गत रस्ते, गटारीचा प्रश्न मार्गी लागला असला तरी रस्त्याच्या कडेला साठलेल्या उकिरड्याचा प्रश्न गंभीर आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य धोका निर्माण झाला आहे.
शहरातील कानेगाव रस्त्यालगत असलेला इंदिरानगर झोपडपट्टीचा भाग हा प्रभाग क्रमांक दोनमध्ये येतो. या प्रभागात अंतर्गत रस्ते व दोन्ही बाजूने गटारी झाल्या आहेत. त्यात पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी विजेचा डीपी नादुरुस्त आहे. यामुळे या भागातील नागरिकांना अधून-मधून कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यात सिमेंट रस्त्याच्या खालून सार्वजनिक पाणीपुरवठ्याची पाईपलाईन गेल्याने काही भागात नळाद्वारे योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याचे नसल्याचे नागरिक सांगत आहेत. याच प्रभागात कानेगाव रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचरा साठत असल्याने या परिसराला उकिरड्याचे स्वरूप आले आहे. यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एकीकडे नगरपंचायतकडून स्वच्छतेवर महिन्याला लाखो रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे येथील स्वच्छतेकडे मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या भागातील रहिवाशांमधून केला जात आहे.
कोट......
प्रभाग क्रमांक २ मध्ये गेल्या पाच वर्षामध्ये सर्वच अंतर्गत सिमेंट रस्ते व गटारीचे कामे पूर्ण झाली आहेत. परंतु, या भागातील पाणी प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. तसेच बरोबर रस्त्यालगत असलेले उकिरड्यांमुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
कुसुम श्रीपती सुरवसे, रहिवासी
कोट......
प्रभाग क्रमांक दोनमध्ये अंतर्गत व मुख्य सिमेंट रस्ते, गटारी झाल्याची कामे झाली आहेत. परंतु, रस्त्याखाली असलेली पाईपलाईन दबली गेल्याने काही भागात योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना नळ असूनसुद्धा सार्वजनिक नळाचे पाणी भरावे लागते.
- मिलिंद नागवंशी, रहिवासी
प्रभाग क्रमांक २ मध्ये निवडणुकीत मतदारांना दिलेल्या अश्वासनाची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करीत आहोत. सिमेंट रस्ते, नाल्यांची कामे करण्यात आली आहेत. कानेगाव रस्त्याच्या कडेला उकिरड्याचा प्रश्न आहे. तोही सोडवून तेथे फुटपाथ करण्याचा मानस आहे.
- जयश्री कांबळे ,नगरसेविका
फोटो - लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील कानेगाव रस्त्यालगत असे उकिरडे साचले आहेत.