पांगरदरवाडी गावात आरोग्य पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:39 AM2021-09-10T04:39:41+5:302021-09-10T04:39:41+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे दोनवर्षीय बालकास डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली होती. याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित ...
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे दोनवर्षीय बालकास डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली होती. याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर याची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांनी आरोग्य पथकास प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. यानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार यांच्या पथकाने बुधवारी पांगरदरवाडी गावास भेट देऊन आढावा घेतला.
या पथकाने डेंग्यूसदृश बाधित रुग्णाच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे रक्त नमुने संकलित केले असून, ते सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. डासांचे निर्मूलन करण्यासाठी पथकातील सदस्यांनी घरोघरी जाऊन ॲबेटिंग केली, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार यांनी गावातील आरोग्यविषयक आढावा घेत ग्रामपंचायतीस तात्काळ धूरफवारणी (फॉगिंग) करण्याचे आदेश दिले.
यावेळी सरपंच बालाजी शिंदे, ग्रामसेविका एम.ए. गलांडे, आरोग्य सहायक सावळे, आरोग्य सेवक देवकर, आशा कार्यकर्त्या सुनीता निंबाळकर, अनुराधा कदम, अंगणवाडी सेविका इंदूबाई शेळके, सुमन जाधव, पार्वती शिंदे आदींची उपस्थिती होते.