पोहताना हार्ट अटॅक; चिमुकल्या मुलींसमोरच बापाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 05:26 PM2023-05-30T17:26:54+5:302023-05-30T17:27:14+5:30
तरुणाने मरणोत्तर केले नेत्रदान; मुलींनी आरडाओरड केल्यानंतर गावकरी जमले, पण तोपर्यंत उशीर झाला होता
तेर (जि. धाराशिव) : शेततळ्यात पोहत असताना हृदयविकाराचा धक्का बसल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हिंगळजवाडी शिवारात सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. मृत्यूनंतर या तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याच्या नेत्रदानाचा निर्णय घेतल्याने तेर येथील रुग्णालयात नेत्रदान करण्यात आले.
धाराशिव तालुक्यातील वाणेवाडी येथील दयानंद अनंता घुटूकडे (३४) हे सोमवारी हिंगळजवाडी शिवारातील शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. त्यांनी सोबत आपल्या दोन लहान मुली व शेजारील मुलींनाही नेले होते. पोहण्यासाठी शेततळ्यात उतरल्यानंतर हृदयविकाराचा धक्का बसल्याने दयानंद हे पाण्यात बुडाले. मुलींनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी या ठिकाणी जमा झाले. त्यांनी लागलीच गावकऱ्यांनाही याची माहिती कळविली. घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांनी दयानंद यांना बाहेर काढले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
दयानंद यांचा मृतदेह तेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. या ठिकाणी गावकरी व मृताच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन दयानंदचा मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. येथे डॉ. गोविंद कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयातील नेत्रचिकित्सक डॉ. आयुब शेख, समन्वयक उमेश गोरे यांनी नेत्र काढून धाराशिव येथील शासकीय रुग्णालयाकडे सुपूर्द केले. यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कोठावळे यांनी शवविच्छेदन केले. दयानंद घुटूकडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ, बहिणी असा परिवार आहे. दयानंद यांच्या पार्थिवावर वाणेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात बसविला होता जम
दयानंद घुटूकडे हे अत्यंत सामान्य आर्थिक स्थिती असलेल्या परिवारातील होते. प्रवासी वाहनांवर काम करून पै-पै जोडत ते ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात उतरले. हा व्यवसाय चांगला चालल्याने अल्पावधीत तेर-पुणे मार्गावर त्यांनी चार ट्रॅव्हल्स सुरू केल्या होत्या. दयानंद तेर येथून तर त्यांचा भाऊ पुण्यातून हा व्यवसाय पाहत होते.