पावसाचे दमदार पुनरागमन ! उस्मानाबाद शहर, ईट, माणकेश्वर मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 09:45 AM2020-07-10T09:45:22+5:302020-07-10T09:47:55+5:30
पिके जोमदार आली असतानाच पावसाने ओढ दिली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते.
उस्मानाबाद/ईट (जि. उस्मानाबाद) : पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असतानाच गुरुवारी रात्री जिल्हयाच्या काही भागात दमदार पाऊस पडला. उस्मानाबाद शहर, भूम तालुक्यातील ईट, माणकेश्वर अशा तीन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरली. परंतू अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणाने दगा दिला. बहुतेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. पिके जोमदार आली असतानाच पावसाने ओढ दिली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. असे असतानाच गुरुवारी रात्री जिल्हयाच्या काही भागात दमदार पाऊस झाला. उस्मानाबाद शहरात सर्वाधिक ९५ मिमी, भूम तालुक्यातील ईट ८५ मिमी तर माणकेश्वर मंडळात ७० मिलिमीटर पाऊस कोसळला. तिन्ही मंडळात अतिवृष्टी नोंदविली गेली. त्याचप्रमाणे भूम ६३, आंबी ६० तर सर्वात कमी २० मिमी वालवड मंडळात पाऊस पडला. उस्मानाबाद शहरातही सायंकाळी ७ वाजता सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत बरसत होता.
परांडा, वाशीतही दखलपात्र पाऊस
परांडा तालुक्यातील जवळा (नि.) ५६ मिमी, असू ५४, परांडा ५५ तर वाशी तालुक्यातील तेरखेडा ४२ आणि पारगाव मंडळात ४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अन्य तालुक्यात मात्र दखलपात्र पाऊस झालेला नाही.