ईट सर्कलमध्ये अतिवृष्टी; दोन तासातच १०० मिलिमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 09:01 AM2020-06-30T09:01:04+5:302020-06-30T09:01:30+5:30
अतिवृष्टी : नदी-नाले दुथडी, शेतातील बांध फुटले
ईट (जि. उस्मानाबाद) - भूम तालुक्यातील ईट मंडळात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. साधारणपणे दोन तासात तब्बल १०० मिमी म्हणजेच अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहिले. पाण्यामुळे अनेकांच्या शेतातील बांध फुटून पिकांचे नुकसान झाले आहे.
दिवसभराच्या उकड्यानंतर सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पावसाळा सुरुवात झाली. साधारणपणे दिड ते दोन तास जोरदार पाऊस कोसळला. यानंतर पावसाचा जोर काही अंशी कमी झाला. मात्र रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरू होता. ईटसह पाखरूड, सोननेवाडी, गिरवली, डोकेवडीसह आदी गावांना या पावसाने झोडपून काढले. सदरील पावसाची नोंद १०० मिमी म्हणजेच अतिवृष्टी झाली आहे. यापूर्वीही ईट सर्कलमध्येच ९९ मिमी पावसाची नोंद झाली होती. या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहिले. तर पाण्यामुळे अनेकांच्या शेतातील बांधबंदिस्तीची कामे वाहून गेली आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील कोवळ्या पिकांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी संगमेश्वर प्रकल्पातील पाणीपातळी वाढण्यास या पावसाची मदत होणार आहे.
पारगाव सर्कलमध्येही अतिवृष्टी
वाशी तालुक्यातील पारगाव सर्कलमध्येही सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. काही तासांत ८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर वाशी सर्कलमध्ये ६० मिमी पाऊस पडला आहे.