दमदार पावसात पूल वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:24 AM2021-06-06T04:24:43+5:302021-06-06T04:24:43+5:30

जेवळी : लोहारा तालुक्यातील सय्यद हिप्परगा येथे शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या दमदार पावसामुळे पाझर तलावजवळ असलेला हिप्परगा ते धानुरी रस्त्यावरील ...

Heavy rain washed away the bridge | दमदार पावसात पूल वाहून गेला

दमदार पावसात पूल वाहून गेला

googlenewsNext

जेवळी : लोहारा तालुक्यातील सय्यद हिप्परगा येथे शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या दमदार पावसामुळे पाझर तलावजवळ असलेला हिप्परगा ते धानुरी रस्त्यावरील पूल वाहून गेला. यामुळे ऐन पेरणी कालावधीतच शेतीकडे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे.

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास जेवळी, विलासपूर पांढरी, माळेगाव, धानुरी, करंवजी, हराळी, भोसगा, सय्यद हिप्परगा या परिसरातील गावात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जवळपास दीड तास जोरदार पाऊस पडला. पावसाचा जोर खूप होता. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याने अनेक शेतशिवारात बंधारे भरून पाणी नाला, ओढ्याला जाऊ लागले. पाण्याचा प्रवाह जास्त झाल्याने सय्यद हिप्परगा येथील जुन्या गावातून धानुरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पाझर तलावाजवळील पूल आणि रस्ता वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. पाण्याचा प्रवाह इतका होता की, पुलामध्ये पाणी जाण्यासाठी टाकलेले मोठमोठे पाईपही वाहून गेले आहेत.

या रस्त्यावरूनच या गावातील जवळपास शंभर ते दीडशे शेतकरी शेतात असतात. रस्त्यावर दहा फूट खोल खड्डा पडल्याने शेतकऱ्याला शेताकडे जाण्यासाठी पूर्णपणे मार्ग बंद झाला आहे. ऐन पेरणीच्या पूर्वी शेतात जाण्यासाठी रस्ता बंद झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. प्रशासनाने त्वरित पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

चौकट........

भूकंपग्रस्त जुन्या गावातून धानुरीला जाण्यासाठी हा रस्ता असून, दहा वर्षांपूर्वी आमदार निधीतून हा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, येथे जवळच पाझर तलाव असल्याने या रस्त्यावर पूल बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु, शासनाकडून याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी शेताला कसे जायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- श्रीशैल ओवांडे, सामाजिक कार्यकर्ते, सय्यद हिप्परगा.

Web Title: Heavy rain washed away the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.