‘माझा समाज’ अंतर्गत चर्मकार कुटुंबांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:23 AM2021-04-29T04:23:58+5:302021-04-29T04:23:58+5:30
कळंब : हातावर पोट असलेल्या अनेक चर्मकार बांधवांचे व्यावसाय ‘लॉकडाऊन’ झाल्याने आलेला दिवस कसा काढावा, चूल कशी पेटवावी, असा ...
कळंब : हातावर पोट असलेल्या अनेक चर्मकार बांधवांचे व्यावसाय ‘लॉकडाऊन’ झाल्याने आलेला दिवस कसा काढावा, चूल कशी पेटवावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे अशा कुंटूबाना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने ‘माझा समाज, माझं कर्तव्य’ असा उपक्रम हाती घेत जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले.
कळंब शहरासह ग्रामीण भागात चर्मकार समाज मोठ्याप्रमाणात आहे. यातील अनेक कुटूंब उदरनिर्वाहासाठी आपल्या परंपरागत व्यवसायावर निर्भर आहेत. शहरात विविध रस्त्यावर त्यांची छोटीखानी दुकाने आहेत.
या लोकांचे व्यवसाय लॉकडाऊनमुळे बंद झाले आहेत. प्रशासनाच्या निर्देशांचे त्यांनी पालन केले असले तरी अशा स्थितीत त्यांना आधार देणारे शासनाने एखादे पॅकेजही दिलेले नाही.
यामुळे हातावर पोट असणाऱ्या चर्मकार समाजातील अशा कुंटूबानी करायचं काय? भागवायचे कसे? चूल पेटवायची कशाच्या बळावर? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
हलाखीची स्थिती असलेल्या अशा अनेक कुंटूबाची व्यथा समोर आल्यानंतर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम यांनी मदतीचा हात पुढं करण्याचा निर्णय घेतला. यासाठी समाजातील काही लोकांना साद घातली.
यातून ‘माझा समाज, माझं कर्तव्य’ हा उपक्रम हाती घेत चर्मकार समाजातील गरजवंताचा शोध घेण्यात आला. यातून त्या कुंटूबाना जीवनावश्यक वस्तुंचे कीट वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली.
चौकट...
एपीआयच्या हस्ते उपक्रमाचा श्रीगणेशा
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ कळंब पोलिस ठाण्याचे सपोनि अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम, दयावान प्रतिष्ठानचे अध्यक्ष इम्रान मुल्ला, पोकॉ फरहान पठाण, साधू शेवाळे, सुहास कदम, तानाजी चव्हाण, अभय गायकवाड, जालिंदर लोहकरे, मधुकर माने, बाबासाहेब कांबळे, सुधीर कदम, प्रकाश कदम, पुष्पक तुपसमुद्रे, लिंबराज ठोंबरे, धनाजी भालेराव आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
गरजु चर्मकार बांधवांना मदत करून कर्तव्य पार पाडले आहे. काही बांधवांची परिस्थिती नाजूक होती. त्यावेळी आम्ही आमच्या समाज बांधवांना ‘माझा समाज माझं कर्तव्य’ या उपक्रमा अंतर्गत मदतीची हाक दिली व ते मदतीला धावून आले. त्यातूनच आम्ही मोठ्या प्रमाणावर कीट बनवू शकलो आणि समाजातील गरजूंपर्यंत मदत करू शकलो. याही पुढेही हा उपक्रम असाच सुरू राहील.
- विकास कदम, युवक जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ