पीक पाहणीलाही ‘हायटेक टच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:36 AM2021-08-13T04:36:50+5:302021-08-13T04:36:50+5:30
कळंब : पिकांच्या नोंदीत अचूकता, पारदर्शकता यावी यासाठी पीक पाहणीला ‘हायटेक टच’ देण्यात येत असून, या अनुषंगाने तालुक्यात ‘ई ...
कळंब : पिकांच्या नोंदीत अचूकता, पारदर्शकता यावी यासाठी पीक पाहणीला ‘हायटेक टच’ देण्यात येत असून, या अनुषंगाने तालुक्यात ‘ई पीक पाहणी’ कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी बुधवारी तलाठी, कृषी सहायकांना प्रशिक्षणही देण्यात आले.
नमुना नंबर बारावर हंगामनिहाय पिकांची नोंद घेण्याचे काम वर्षानुवर्षे तलाठी करत असतात. यावरच लागवड क्षेत्राची आकडेमोड, विविध योजनांचे ‘गृहीतक’ बेतलेले असते. कामाचा व्याप असतानाही हे क्षेत्रीय काम तलाठ्यांना करावे लागते. यामुळे त्यांचा व्याप कमी करून पीक पाहणी, नोंदणीत अचूकता यावी, याकामी शेतकऱ्यांचा स्वयंसहभाग असावा यासाठी शासनाने ‘ई पीक पाहणी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या नमुना नंबर बारासाठी आवश्यक असलेली पीक पाहणीची माहिती स्वतः शेतकरी अपलोड करतील, यावर विशेष ‘फोकस’ केला जात आहे.
चौकट...
स्वयंनोंदणीवर भर, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
‘माझं शेत माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीकपेरा’ हे घोषवाक्य घेत शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पिकांची हायटेक अशा ‘ई पीक पाहणी’ ॲपवर नोंदणी करावी यावर भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांनी अक्षांश, रेखांशासह अपलोड केलेला फोटो व पीक माहिती सात दिवसांच्या आत तलाठ्यांना बारा नंबरवर अद्ययावत करायची आहे. यासाठी कृषी सहायक, तलाठी यांना बुधवारी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसीलदार रोहन शिंदे, तालुका कृषी अधिकारी बी. बी. जाधव, नायब तहसीलदार अस्लम जमादार, कृषी अधिकारी सचिन ढेरे यांनी मार्गदर्शन केले.
अशी आहे प्रक्रिया...
यासाठी शेतकऱ्यांना स्मार्टफोनचा वापर करत प्ले स्टोअरमधून ‘ई पीक पाहणी’ ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. या ॲपवर मोबाइल क्रमांक नोंदणी करून सातबारावरील नावाप्रमाणे नाव नमूद करावे लागेल. यानंतर सर्व खातेक्रमांक दिसतील. ते निश्चित करून चार अंकी पासवर्डचा संदेश प्राप्त होईल. हा पासवर्ड टाकून नोंदणी पूर्ण होईल. यानंतर शेतात उभे राहून जीपीएस अनेबल्ड पिकांचा फोटो अपलोड करावा लागेल. एका मोबाइल क्रमांकावरून असे २० खाते अपलोड करता येतील.
असा आहे कालबद्ध कार्यक्रम
१ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट - प्रचार व प्रसिद्धी, १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर - नोंदणी, फोटोसह माहिती अपलोडिंग १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर - नमुना पडताळणी, अंतिम स्वरूप देणे.