शहरात चोरट्यांचा हैदोस,दोन घरफोड्यात पाच लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:37 AM2021-08-13T04:37:27+5:302021-08-13T04:37:27+5:30
वाशी शहरात १२ आॅगस्ट रोजी पहाटेपूर्वी अज्ञात आठ चोरट्यांनी हैदोस घालत सोन्याचांदीच्या दागिने व रोख रक्कम असा पाच लाख ...
वाशी शहरात १२ आॅगस्ट रोजी पहाटेपूर्वी अज्ञात आठ चोरट्यांनी हैदोस घालत सोन्याचांदीच्या दागिने व रोख रक्कम असा पाच लाख रूपयाचा ऐवज लंपास केला आहे़ शहरातील हवेली भागात १२ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांचे आगमन झाले़ त्यांच्या अंगावर बनियन,बरमुडा व अंडरविअर असा पोशाख होता़ या भागात चोरटे आल्याची माहिती मिळताच या भागातील नागरिकांनी पोलिसांना कल्पना दिल्यानंतर पोलिसांची गाडी सायरनचा आवाज करत आल्याबरोबर बाजूच्या शेतातून चोरटे पसार झाले़ पोलिसांची गाडी गेल्यानंतर चोरट्यांनी चांभारवाड्यातील गणेश महादेव नन्नवरे यांच्या घरात प्रवेश करत महादेव नन्नवरे यांना चाकूचा धाक दाखवत घरातील २५ हजार रोख व ६३ हजार सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले़ आरडाओरड केल्यावर व पोलिसांना सांगितल्यावर जिवे मारून टाकूत अशी धमकी दिल्यामुळे घरातील सर्वजण गप्प राहिले़ चोरट्यांनी पलायन केल्यानंतर याची कल्पना पोलिसांना दिली़ पोलीसही तात्काळ घटनास्थळी आले मात्र तोपर्यंत चोरटे पुन्हा अंधाराचा फायदा घेत बाजूच्या शेतात पळून गेले होते़
चोरट्यांनी तेथून पुन्हा बस स्थानकाकडे जाणाऱ्या रोडवरील अॅड. वसंतराव जगताप यांच्या घराकडे मोर्चा वळवला मात्र घरातील सर्वजण जागे झाल्यामुळे तेथून पळ काढत तहसिलच्या बाजूस असलेल्या वसंतराव पवार यांच्याघराकडे गेले मात्र तेथेही घरातील मंडळी जागे झाल्यामुळे तेथून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवत तहसिल कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या वनमाला गजानन स्वामी यांच्या निवासस्थानाचा कोयंडा लोखंडी कटावनीने काढून घरात प्रवेश केला़ घरातील व्यक्तीने दरवाजा उघडत असल्याचे दिसताच त्यांनी आतून दरवाजा ढकलून धरण्याचा प्रयत्न केला मात्र सहा ते आठ चोरट्यांनी दरवाजा जोराने ढकलून आत प्रवेश केला व वनमाला स्वामी यांचे पती गजानन स्वामी यांच्या डोक्यात लोखंडी गज घालून त्यांना जख्मी केले तर गजानन यांच्या आईच्या पाठीत लाकडाने मारहाण करत घरात व अंगावर काय आहे ते गुपचूप द्या अन्यथा धारधार शस्त्राने मारू अशी धमकी दिल्यामुळे सासू-सुनाच्या अंगावरील सोन्याचे दागिने कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे सर्व मिळून ४ लाख १० हजार रूपयाचा ऐवज घेऊन पळ काढला़ सदरील शासकीय निवासस्थान हे गावापासून फार दूर असून तुरळक निवासस्थाने आहेत़ चोरट्यांनी निवासस्थानाच्या बाजूस जवळच असलेल्या लिंबाच्या झाडाखाली मोबाईलच्या उजेडात बसून सोन्याचे दागिने काढून घेत इतर साहित्य त्या ठिकाणी टाकून निवांतपणे तेथून निघून गेले़
सदरील घटनेची माहिती मिळताच सपोनि अशोक चवरे व त्यांच्या सहकाºयांनी तात्काळ घटनास्थळास भेट देत पाहणी केली व सविस्तर माहिती वरिष्ठांना कळवली़ जिल्हा पोलीस प्रमुख राकेश रोशन, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पालवे, भूमचे उपविभागीय अधिकारी डॉ़ विशाल खांबे यांनी भेट देत तपासविषयी मार्गदर्शन केले़ स्थागु शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे,पोलीस निरीक्षक उस्मान शेख, येरमाळ्याचे सपोनि गणेश शिंदे यांनी घटनास्थळास भेट देत तपासास आरंभ केला आहे़ ठसे तज्ज्ञासह श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते़ ठरल्याप्रमाणे श्वान घटनास्थळापासून जवळ असलेल्या कन्हेरी रस्त्यावर येऊन थांबले़ पोलिसात दोन्ही गंभीर चोऱ्यांची नोंद करण्यात आली आहे़ चोरीचा गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या आवारात १२ आॅगस्ट रोजी ५ वाजेपर्यंत तक्रारदार थांबले होते़ यापूर्वी बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जगताप यांच्या घरी चोरी झाली होती याठिकाणीही पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह तपासी यंत्रणांनी भेट देत चोरीचा शोध लावण्यात येईल असे आश्वस्त केले होते मात्र अद्याप त्या चोरीचा शोध लागलेला नाही़ वाशी पोलीस स्टेशन अंतर्गत गावाची संख्या जास्त व कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यावरच सर्व मदार अवलंबून असून याठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची संख्या वाढवून गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे़