महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:34 AM2021-03-23T04:34:40+5:302021-03-23T04:34:40+5:30
रखडलेल्या कामांसाठी दिली महिनाभराची ‘डेटलाईन’ उमरगा : राष्ट्रीय महामार्गाचे काम अधर्वट स्थितीत व निकृष्ट दर्जाचे झाल्याने या मार्गावर अनेक ...
रखडलेल्या कामांसाठी दिली महिनाभराची ‘डेटलाईन’
उमरगा : राष्ट्रीय महामार्गाचे काम अधर्वट स्थितीत व निकृष्ट दर्जाचे झाल्याने या मार्गावर अनेक अपघात होऊन जीवितहानी होत आहे. शिवाय, निकृष्ट कामामुळे प्रवाशांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत असतानाही प्राधिकरणाने शंभर टक्के टोल वसुली सुरू केली आहे. यामुळे येथील तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत आ. चौगुले यांनी महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. तसेच चौपदरीकरणाचे उर्वरित काम महिनाभरात पूर्ण करावे, असे आदेश दिले.
गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेले महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट झालेले असून, रस्ते सुरक्षा विषयक कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नसल्यामुळे अपघाताचे प्रमाणात वाढले आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे असून, एकाही उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच महामार्गालगत ड्रेनेज व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना त्रास होत असल्याचा मुद्दा आ. ज्ञानराज चौगुले यांनी बैठकीत महामार्ग प्राधिकरणच्या व कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. हे काम करतेवेळी रस्ते सुरक्षा नियमांच्या अनुषंगाने अनेक त्रुटी असल्याने वारंवार अपघात, जीवित हानी होत आहे. या बाबीचा विचार करून ही कामे येत्या महिनाभरात पूर्ण करण्याचे आदेश आ. ज्ञानराज चौगुले यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा मुंडे-उदमले, संजय पवार तहसीलदार उमरगा, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संजय सिंग, कदम, उपअधीक्षक भूमिअभिलेख गवई व्ही. एस., तालुका प्रमुख बाबूराव (मामा) शहापुरे, पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, विधानसभा अध्यक्ष शरद पवार, योगेश तपसाळे, संदीप चौगुले, आदी उपस्थित होते.
चौकट.....
निधीच्या तरतुदीसाठी गडकरींना भेटणार
या बैठकीत आवश्यक त्या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी भुयारी मार्ग, पादचारी उड्डाणपूल, सुरक्षा युक्त वळण रस्ते, पथदिव्यासह सर्व्हिस रोड, स्ट्रीट लाईट बसविणे, रॅम्प बसविणे, सुरक्षायुक्त चौक, कोरेगाव रोड वरील उड्डाणपुलाखालील ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करण्याचे आदेश दिले. तसेच महामार्गाच्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद होणे, भूसंपादन प्रक्रियेतील उर्वरित निधी संबंधित शेतकरी व जागा मालकांना त्वरित मिळवून देणे, आदींविषयी एका संयुक्त शिष्टमंडळाद्वारे रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची पुढील महिन्यात भेट घेण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला.